दहा बाजार समित्यांमधील ३० स्वीकृत संचालकांची पदे रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 05:53 PM2018-08-12T17:53:13+5:302018-08-12T17:55:28+5:30
बुलडाणा : जिल्ह्यातील १३ पैकी दहा बाजार समित्यांवरील नियुक्त ३० स्वीकृत संचालकांची पदे सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या निर्णयानुसार रद्द करण्यात आली आहे.
बुलडाणा : जिल्ह्यातील १३ पैकी दहा बाजार समित्यांवरील नियुक्त ३० स्वीकृत संचालकांची पदे सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या निर्णयानुसार रद्द करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दहा आॅगस्ट रोजी या संदर्भातील आदेश तथा सुचना निर्गमित करून तांत्रिक दृष्ट्याही त्यावर शिक्का मोर्तब केले. राज्य शासनाने १३ जून २०१७ रोजी महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (विकास व नियमन) अधिनियमन १९६३ मधील सुधारणा अध्यादेश काढला होता. त्यामुळे नगर पालिका, ग्रामपंचायत, पंचायत समिती व पणन प्रक्रिया सहकारी संस्था प्रतिनिधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळात असल्याची तरतूद रद्द झाली होती. या अध्यादेशाचा आधार घेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने हा आदेश निर्गमीत करून अध्यादेशाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केली आहे. या संदर्भातील आदेशही जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांना पाठवले आहेत. राज्यातील अन्य जिल्ह्यात या संदर्भातील मधल्या काळात कार्यवाही झालेली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ती आता झाली. जुन्या कायद्यानुसार बाजार समित्यांच्या निर्वाचित १८ जणांच्या संचालक मंडळामध्ये नगर पालिका, पणन प्रक्रिया उद्योग आणि पंचायत समितीमधून प्रत्येकी एक या प्रमाणे तीन स्वीकृत सदस्य घेण्यात येऊन हे संचालक मंडळ २१ जणांचे होत होते. या स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार नव्हता. मात्र संचालक मंडळामध्ये त्यांचे स्थान महत्त्वाचे होते. त्यामुळे या स्वीकृत संचालकांना एक वेगळे महत्त्व राजकीय दृष्ट्या होते. परिणामी ही पदे प्रतिष्ठेची बनलेली होती. दरम्यान, बाजार समित्यांच्या रचनेमध्ये यापूर्वी विविध अधिनियमांच्या आधारे बदल करण्यात आले आहेत. सोबतच विविध मतदार संघाचे किंवा प्रवर्गाला प्रतिनिधित्व करणे शक्य व्हावे म्हणून हे बदल वेळोवेळी करण्यात आले आहेत. त्यानुषंगाने सध्या बाजार समित्यांच्या २१ संचालक मंडळावर कृषि, पतसंस्था व बहुउद्देशिय सहकारी संस्था व्यवस्थापन समित्यांच्या सदस्यांनी आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी निवडून दिलेले सदस्य आहेत. इतर सदस्य व्यापारी, अडते, हमाल व तोलारी यांच्यामधून निवडून दिलेले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात १३ बाजार समित्या आहेत. पैकी दहा बाजार समित्यांमधील प्रत्येकी तीन अशा या ३० स्वीकृत संचालकांची पदे रद्द करण्यात आली आहे. तीन बाजार समित्यांवर प्रशासक बुलडाणा जिल्ह्यातील १३ बाजार समित्यांपैकी सिंदखेड राजा, मलकापूर आणि मोताळा बाजार समितीवर जवळपास चार ते पाच वर्षापासून प्रशासक नियुक्त आहेत. त्यामुळे या बाजार समित्यांवर प्रत्येकी तीन स्वीकृत संचालक असण्याचा प्रश्नच उद्भव नाही. त्यामुळे प्रत्यक्षात जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांमधील हे ३० स्वीकृत संचालकांची पदे रद्द करण्यात आली असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सुत्रांनी स्पष्ट केले आहे.