राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे ठरताहेत अपघातास कारणीभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 02:33 PM2019-09-24T14:33:33+5:302019-09-24T14:33:59+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या विस्तारीकरणाचे काम मागील काही महिन्यापासून थांबले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर खामगाव ते नांदुरा मार्गावर जागोजागी खड्डे पडले असून यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. राजकीय, सामाजिक संघटनांकडून वारंवार रस्त्याच्या डागडुजीची मागणी होत असल्यानंतरही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.
गत दीड वर्षापासून राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत संथगतिने सुरु आहे. रस्त्याचे बांधकामास गती यावी यासाठी गावकऱ्यांनी सुद्धा वाहने थांबवून रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली मात्र रस्त्याचे काम ‘आयएलएफएस’ कंपनीनेच बंद केल्याचे महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या पावसाळ््याचे दिवस असून रस्त्यातील खड्यामुळे किरकोळ अपघात घडत आहेत. शिवाय या मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. प्रशासनाने दखल घेवून रस्त्याची डागडूजी करणे गरजेचे झाले आहे. (प्रतिनिधी)
मातीमिश्रीत मुरुम टाकून थातूरमातूर डागडूची
खामगाव ते नांदुरा या मार्गावरील खड्डे बुजवण्याची ओरड होत होती. याची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने खड्डे बुजवण्याचे काम नागपूरच्या अवजारे कंपनीला दिले आहे. मात्र खडड्े बुजवण्याचे काम सुद्धा निकृष्टदर्जाचे सुरु असल्याचे दिसून आले. खडड्यांमध्ये मातीमिश्रीत मुरुम टाकला जात आहे. यामुळे रस्त्यावर चिखल होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या विस्तारीकरणाचे काम मागील काही महिन्यापासून थांबले आहे. मात्र पावसाळयात नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता रस्त्याची डागडूजी सुरु झाली आहे. नागपूरच्या अवजारे कंपनीला हे काम दिले आहे. हे काम तात्पुरते आहे. काही दिवसातच राष्ट्रीय महामार्गाच्याविस्तारीकरणाचे काम सुरु होईल.
- विलास ब्राम्हणकर,
प्रकल्प संचालक,
महामार्ग प्राधिकरण, अमरावती.