राज्यातले सत्ता समीकरण ‘झेडपी’त जुळणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 03:00 PM2019-11-29T15:00:49+5:302019-11-29T15:01:01+5:30
जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचे नवे समिकरण समोर आल्यास अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे औसुक्याचे ठरले आहे.
- सुधीर चेके पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा तुर्तास सुटला असून मंत्रालयाची सूत्रे महाविकास आघाडीने हाती घेतली आहेत. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांकडे वळणार आहे. गतवेळी राज्यात भाजप-सेना युतीत असतानाही सत्ताधारी भाजपा आणि राष्टÑवादी काँग्रेस यांची जवळीक लपून राहीलेली नव्हती. तोच कित्ता जिल्हा परिषदेत गिरविण्यात आला. येथे शिवसेनेच्या पतनासाठी जिल्हा परिषदेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने राष्टÑवादीशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली होती. मात्र, आता राज्यात बदलेल्या राजकीय परिस्थितीनुसार जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचे नवे समिकरण समोर आल्यास अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, हे पाहणे औसुक्याचे ठरले आहे.
जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदांचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले. बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिला, असे जाहीर झाले असल्याने सलग चौथ्यांदा जि. प. अध्यक्षपदी महिला विराजमान होणार आहे. एकूण ६० सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत आजरोजी भाजप २४, काँग्रेस १४, शिवसेना ९, राष्टÑवादी ९, भारिप-बमसं ३ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. यामध्ये भाजपाच्या माजी महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी आमदारकीची निवडणूक जिंकल्याने उंद्री जि. प. गटाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला असल्याने एक जागा रिक्त आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेत सध्या एकूण ३२ महिला सदस्यांची संख्या आहे. या सदस्यांमधून अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असतानाच राज्यात शिवसेना-राष्टÑवादी व काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले असल्याने त्याचधर्तीवर जिल्हा परिषदेतही सत्तांतराचे वारे वाहत आहे.
गतवेळी राज्यात सत्ताधारी भाजपाने शिवसेनेच्या सहकार्याने सत्ता स्थापन केली होती; मात्र सेना-भाजपातील तू-तू, मै-मै आणि भाजपाची राष्टÑवादी काँग्रेसशी असलेली जवळीक, याचे लोण जिल्हा परिषदेपर्यंत पोहचले होते. स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या करिष्म्यामुळे जिल्हा परिषदेत ऐतिहासीक मुसंडी मारणाºया भाजपने ६० पैकी २४ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर पारंपारीक मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला दूर सारून राष्टÑवादीच्या टेकूवर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. मात्र, आता राज्यातील सत्तासमिकरण बदलेले आहे.
राज्यात महाविकासआघाडीने सत्ता स्थापन केली असल्याने जिल्हा परिषदेतही काँग्रेस-शिवसेना आणि राष्टÑवादी असे नवे समिकरण समोर येण्याची शक्यता आहे. या समिकरणात जिल्हा परिषदेतील पक्षीय बलानुसार महाविकास आघाडीत काँग्रेसकडे सर्वाधिक १४ सदस्य संख्या असल्याने अध्यक्षपदावर काँग्रेसचा दावा अधिक राहणार आहे. तर राष्टÑवादी व शिवसेनेकडे समान संख्या असल्याने उपाध्यक्षपद अथवा बांधकाम सभापती सारख्या महत्वाचे पद पदरात पाडून घेण्याखेरीज शिवसेना व राष्टÑवादीला पर्याय नाही. असे असले तरी महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांचा डोळा अध्यक्षपदावरच राहणार असल्याने अध्यक्षपदाच्या घोडेबाजारात राज्यातील जुळून आलेल्या सत्तासमिकरणाचा जिल्हा परिषदेत कितपत निभाव लागतो, ही बाब रंजक ठरणार आहे.
राष्टÑवादी काँग्रेसची भूमिका महत्त्वाची
राज्यात गतवेळच्या भाजप-सेनेच्या सत्तास्थापनेत आणि यावेळच्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होण्यामध्ये राष्टÑवादी काँग्रेसची भूमिका महत्वपूर्ण राहीली आहे. तशीच भूमिका जिल्हा परिषदेतही भाजप सत्तास्थापनेत राष्टÑवादीची ठरली होती. मात्र, आता राज्यात सत्तांतर झाले असल्याने त्याचे लोण जिल्हा परिषदेतही पोहचणार हे निश्चित मानले जात आहे. सत्ता स्थापन करताना महाविकास आघाडीत जास्त सदस्य असलेल्या काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापण्याची संधी मिळेल. मात्र, येथेही राष्टÑवादी काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरणार असल्याने जर राष्टÑवादी काँग्रेसने अध्यक्षपदावर दावा ठोकला आणि त्यावर ठाम राहीली तर जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेचा तिढा देखील राज्याच्या धर्तीवर नाटकीय वळणावर येण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शिवसेना आणि काँग्रेस कोण्यात्याही परिस्थितीत भाजपसोबत जाणार नाही, हे निश्चत असल्याने हे दोन्ही पक्ष नेमकी कोणती भूमिका घेणार हा प्रश्नही आहेच.