वादळी वाऱ्यासह पावसाने वीज गुल; रात्रीच्या अंधारात खामगावात रंगला खुनाचा थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 01:30 PM2024-05-27T13:30:44+5:302024-05-27T13:30:55+5:30
प्रतीहल्ल्यात एक जखमी: चौघांविरोधात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जोरदार वादळी वार्यासह आलेल्या चक्रीवादळाचे थैमान थांबत नाही तोच, खामगावात वीज गुल असताना खुनाचा थरार रंगला. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानका समोर ही घटना घडली. या घटनेमुळे खामगावात एकच खळबळ माजली आहे.
तक्रारीनुसार, मृतक प्रकाश गोपीनाथ सोनी (५२) त्यांच्या बसस्थानकासमोरील हाॅटेलात बसले असताना विजय सहदेव बढे, विठ्ठल एकनाथ बढे आणि दोन अनोळखी इसम घटनास्थळी आले. १५ दिवसांपूर्वी दुकानावर आलेल्या आमच्या माणसांना धक्का का मारला असा जाब विचारत कुकरी (तीष्ण हत्याराने) प्रकाश सोनी यांना भोसकले. छातीत घाव लागल्याने सोनी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पळून जात असताना प्रत्यक्षदर्शीनी एका आरोपीस पकडले.
दरम्यान, काहींच्या हाताला झटका देत पकडलेला आरोपी खामगाव बाळापूर रस्त्याने धावत सुटला. संतप्त जमावाने पाठलाग करून आरोपीस पकडले. त्यावेळी घटनास्थळी वेळीच पोलीस दाखल झाले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलीसांनी आरोपीला पकडून खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती केले. तर तीन आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी गोपाल प्रकाश सोनी २७ रा. रेखा प्लॉट, सती फैल यांच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी विजय सहदेव बढे, विठ्ठल एकनाथ बढे आणि आणखी दोन अनोळखी इसमाविरोधात भादंवि कलम ३०२, ३४ गुन्हा दाखल केला. यातील आरोपी विजय बढे हा केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस असल्याचे समजते.
घटनास्थळावरून कार जप्त
घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळी सोडलेली एक कार शहर पोलिसांनी जप्त केली. ही कार शहर पोलीस स्टेशनला लावण्यात आली. प्राप्त माहितीनुसार पैशांच्या वादातून हा खून झाल्याची चर्चा पोलीस वतुर्ळात होत आहे. त्यामुळे शहर पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. शहर पोलीसांनी घटनास्थळाचे सोमवारी दुपारी स्थळ निरिक्षण केले.