सत्तेसाठी काहीपण !
By admin | Published: March 15, 2017 01:42 AM2017-03-15T01:42:32+5:302017-03-15T01:42:32+5:30
निवडणुकीपूर्वी प्रखर टीका, नंतर एकत्र
विवेक चांदूरकर
बुलडाणा, दि. १४- तत्त्व, विचारधारा आणि पक्षनिष्ठेला आता राजकारणात स्थान राहले नसून केवळ सत्ता हाच एकमेव धागा राजकीय पक्षांना बांधून असल्याचे जिल्ह्यात पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापण्याकरिता झालेल्या आघाड्यांमधून निदर्शनास येते. जिल्ह्यात पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापण्याकरिता परंपरागत विरोधी पक्षांना जवळ करीत मित्रपक्षांनाच दूर सारण्यात आले.
मंगळवारी जिल्ह्यात पार पडलेल्या पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात धक्कादायक आघाड्या करण्यात आल्या. भाजपने शिवसेनेला बाजुला सारून काँग्रेसला तर कुठे राष्ट्रवादीला जवळ केले. तर राष्ट्रवादीने शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षांशी वेगवेगळ्या ठिकाणी युती केली आहे. कालपर्यंत धर्मांध शक्तीच्या आम्ही विरोधात असल्याचे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सांगत होते, आज मात्र त्याच धर्मांध शक्ती संबोधिलेल्या पक्षाशी त्यांनी जवळीकता साधली. कुठे सरळ पाठिंबा देवून काही ठिकाणी वेगळी खेळी खेळून या पक्षांनी एकमेकांना मदत केल्याचे स्पष्ट दिसते. जिल्ह्यात जिल्हा परिषदेत व पंचायत समितीत मोठय़ा प्रमाणात सदस्य निवडूण आल्यावरही भाजप व काँग्रेसला सभापती पदाच्या समान जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस- राष्ट्रवादी व शिवसेना जिल्ह्यात एकत आली तर बहूतांश पंचायत समिती त्यांच्या ताब्यात असत्या. मात्र, अशी सरळ युती न करता पंचायत समितीनिहाय युती करण्यात आली. चिखलीमध्ये तर परस्पर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा सभापती तर भाजपचा उपसभापती झाला. नांदूर्यातही नाट्यमय घडामोडींनंतर सभापतीपद काँग्रेसकडे तर उपसभापती पद शिवसेनेकडे गेले. लोणार व सिंदखेड राजा या दोन तालुक्यांची सीमा एकच आहे. मात्र, या दोन्ही पंचायत समितीत राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या पक्षांशी घरोबा केला आहे. लोणार राष्ट्रवादीने शिवसेनेशी तर सिंदखेड राजामध्ये भाजपशी युती केली. अनेक ठिकाणी काँग्रेस व शिवसेनेच्यावतीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता प्रयत्न झाले. आगामी काळात याचे दुरगामी परिणाम दिसतील की मतदारही याकडे डोळेझाक करतील हे येणारा काळच सांगेल.
जिल्हा परिषदेवर पडणार परिणाम
२१ मार्च रोजी जिल्ह्यात विविध पक्षांना जिल्हा परिषद अध्यक्षासाठी सत्ता स्थापण करावी लागणार आहे. पंचायत समितीत अशाप्रकारे युती करण्यात आल्यामुळे आता जिल्हा परिषदेत कोणती युती किंवा आघाडी जन्माला येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंचायत समितीमध्ये झालेल्या युती व आघाडीनंतर आता जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण करण्याकरिता शिवसेना व भाजप एकत्र येईल की नाही? याबाबत शंका व्यक्त केल्या जात आहे. जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढत आहे. त्यामुळे भाजपला सत्तेपासून दूर सारण्याकरिता जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंचायत समितीमधील युती व आघाडीचा जिल्हा परिषदेवर निश्चितच प्रभाव पडणार आहे.
निवडणुकीनंतरचे चित्र
पंचायत समिती | या पक्षांनी एकमेकांना मदत केली |
बुलडाणा | काँग्रेस - भारिप |
मोताळा | काँग्रेस - शिवसेना |
सिंदखेड राजा | राष्ट्रवादी काँग्रेस - भाजप |
लोणार | शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस |
शेगाव | काँग्रेस - भारिप |