रस्ता विस्तारिकरणाच्या कामासाठी वीज चोरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 11:05 AM2021-03-25T11:05:17+5:302021-03-25T11:05:30+5:30
Power theft for road widening work! काही ठिकाणी कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांना दंड ठोठावण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: रस्ता विस्तारीकरण करताना मॉन्टे कॉर्लो कंपनीसोबतच या कंपनीकडून नेमण्यात आलेल्या उपकंपन्यांकडून सर्रास वीजचोरी केली जात आहे. यामध्ये काही ठिकाणी कंपनी आणि तिच्या उपकंपन्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. तर काही ठिकाणी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून संबंधित वीजचोरीला पाठीशी घातल्या जात असल्याचे चित्र आहे.
टेंभूर्णा ते चिखली घोडसगाव पर्यंतच्या रस्ता विस्तारीकरणाचा कंत्राट अहमदाबाद येथील ‘मॉन्टे कार्लो’ कंपनीला देण्यात आला आहे. या कपंनीकडून पूलनिर्मिती आणि इतर कामासाठी स्थानिक कंत्राटदारांना तसेच काही कंपन्यांना काम दिले. ही कामे करताना ‘मॉन्टे कार्लो’सोबतच स्थानिक कंत्राटदार आणि उपकंपन्यांकडून रस्ता कामा दरम्यान ठिकठिकाणी विजेची चोरी केली जात आहे.
वीजचोरीप्रकरणी आता शेतकऱ्यांना कारवाईस सामोरे जावे लागत असल्याने, शेतकरीही वेठीस धरल्या जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये ‘मॉन्टे कार्लो’ आणि तिच्या उपकंपन्यांबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.
यासंदर्भात अधिक माहितीसाठी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता (ग्रामीण) यांच्याशी संपर्क केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सात ठिकाणी विज चोरी उघड!
नांदुरा रोडवरील पारखेड फाटा ते पहुरजीरा-माक्ता, कोक्ता, जयपूर लांडे, शेलोडी शिवार ते टेंभूर्णा अकोला रोडपर्यंत रस्ता विस्तारीकरणाचे काम करताना तब्बल सात-आठ ठिकाणी वीजचोरीचा प्रकार उघडकीस आला. यामध्ये टेंभूर्णा फाटा, पारखेड, जयपूर लांडे, आणि शेलोडी शिवारातील दोन ठिकाणचा समावेश आहे. टेंभूर्णा नजीक १८ जानेवारी रोजी लोखंडी सळई कापण्याचे कटर, तीन सॉकेट, लाईट, वायर आदी साहित्य जप्त करण्यात आले.