व्यवहार ज्ञानाच्या धड्यातून वाढतेय शिक्षणाची गोडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:05 PM2018-06-12T16:05:06+5:302018-06-12T16:05:06+5:30
खामगाव: आधुनिक कॉन्व्हेंट संस्कृतीच्या काळातही जिल्हा शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत खिळवून ठेवण्याची क्लृप्ती एका शिक्षिकेने शोधून काढली आहे.
- अनिल गवई
खामगाव: आधुनिक कॉन्व्हेंट संस्कृतीच्या काळातही जिल्हा शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत खिळवून ठेवण्याची क्लृप्ती एका शिक्षिकेने शोधून काढली आहे. शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता, व्यवहार ज्ञानाचेही धडे ही शिक्षिका विद्यार्थ्यांकडून गिरवून घेत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांची शालेत रूची वाढत असून, शिक्षिकेच्या या उपक्रमामुळे शाळेतील पटसंख्या वाढविण्यास मदत मिळत असल्याचे दिसून येते.
शिक्षण हे कालानुरुप बदलत चाललेले असताना या पुस्तकी ज्ञानासोबतच शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहार, हिशोब, जमाखर्च, जमाखर्चाचा ताळेबंद, पैशांचे नियोजन, बचतीची सवय, बँकाचे कामकाज व बँकाचे कामकाज व बँकामधील विविध कागदपत्रे यासारख्या अनेक बाबी माहित होणे काळाची गरज आहे. किबहुंना विद्यार्थी हा पुस्तकी किडा न बनता त्याचे जीवन विविध अनुभव समृद्ध बनावे यासाठी नांदुरा तालुक्यातील अंबोडा जि.प.मराठी उच्च प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षिका श्रीमती सविता लीलाधर तायडे या विविध अभिनव उपक्रमाव्दारे विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे धडे देत आहेत. त्यांच्या अभिनव उपक्रमापैकी एक असलेला हा उपक्रम म्हणजे विद्यार्थी सहकारी बँक हा होय. अगदी वास्तवातील बँकेप्रमाणेच सर्व रचना असलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना शाळेची गोडी तर लावतोच परंतु त्यासोबतच व्यवहार ज्ञानाचा त्यांचा पारंभिक पाया मजबूत करतो. बँकेच्या वास्तव रचनेप्रमाणेच रचना, सर्व कागदपत्रे, बँक पासबुक, लेजर बुक, रक्कम काढणे-भरणे फॉर्म इत्यादी सर्व प्रकारची कागदपत्रे हुबेहुब श्रीमती तायडे यांनी बनवून घेतली आहेत. कामकाजाचे नियोजन ही छोटी मुले अतिशय काळजीपूर्वक करतात तसेच इतर मुले त्यानुसार अतिशय शिस्तीत आणि शांत पध्दतीने हे कामकाज निरीक्षण करतात व समजून घेतात. या अभिनव उपक्रमातून शालेय वयातच पैशाचे महत्व, दैनंदिन व्यवहार, हिशोब, जमाखर्च, जमाखर्चाचा ताळेबंद, पैशांचे नियोजन, बचतीची सवय, बँकाचे कामकाज व बँकामधील विविध कागदपत्रे यासारख्या अनेक बाबी विद्यार्थ्यांना समजण्यास सुलभ आहे.
गणिताचीही वाढते गोडी!
गणित हा तसा रुक्ष विषय परंतु अशा प्रकारच्या उपक्रमातून गणितातील काही उदाहरणे विद्यार्थ्यांना समजणे सोपे झाले आहे. तसेच गणिताशी त्यांचे आकलन सोपे झाले आहे. गणित विषयाबद्दलची भीती, कंटाळा, आळस, विद्यार्थ्यांच्या मनातून निघून जाऊन त्याची जागा आता सतत काहीतरी नवीन शिकण्याचा, नवनिर्मीतीचा , प्रात्यक्षिकातून शिकण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी करीत आहे.
शाळेतील नवोपक्रमामुळे माझ्या पाल्याला अभ्यासाची गोडी लागली. अनेक सकारात्मक बदल आपल्याला शाळेमध्ये जाणवत आहेत. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल आपण अनुभवत आहोत. ही बाब आपल्यासाठी आनंददायी आहे.
- संतोष बगाडे, पालक, अंबोडा, ता. नांदुरा.