स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांच्यावर हल्ला, रात्रीच पोलिसांत ठिय्या
By सदानंद सिरसाट | Published: September 29, 2022 10:44 AM2022-09-29T10:44:00+5:302022-09-29T10:45:05+5:30
हल्लेखोरावर कारवाईच्या मागणीसाठी रात्रीच पोलिस ठाण्यात ठिय्या व घोषणाबाजी
शेगाव (बुलढाणा) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशात डिक्कर यांची गाडी अडवून त्यांना मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा शेगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक गावाजवळ घडली.
येत्या ४ ऑक्टोबर रोजी आयोजित शेतकरी मोर्चा च्या पार्श्वभूमीवर जवळा बुद्रुक येथे शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे कार्यकर्त्यासह बुधवारी सायंकाळी गेले होते.
या ठिकाणची सभा आटवून परत निघाले असता रविकांत तुपकर यांच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवून मारहाण केल्याचा आरोप खुद्द डिक्कर यांनी प्रसारमाध्यमांसमोर केला आहे. याशिवाय रात्री शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन घडलेल्या प्रकरणाबाबत माहिती दिली. या ठिकाणी मारहाण करणाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी करत काही वेळ स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांनी ठिय्या दिला व घोषणाबाजी केली.
शेगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी येत्या ४ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय शेगाव येथे शेतकरी मोर्चा आयोजित आहे. या मोर्चाची माहिती देण्यासाठी जवळा बुद्रुक येथे गेलो. तेथून परतल्यानंतर रविकांत तुपकर यांचे कार्यकर्ते श्याम अवथळे व इतरांनी गाडी अडवून मारहाणीचा प्रयत्न केला. दरम्यान माझेवरील वार मधात येवून कार्यकर्त्यांनी वार स्वतःवर घेतले. रविकांत तुपकर यांच्या कार्यकर्त्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. शेतकरी संघटना मोडकळीस आणण्याच काम तुपकर करीत आहेत.
- प्रशांत डिक्कर
विदर्भ अध्यक्ष स्वाभिमान शेतकरी संघटना