जागतिक तिरंदाजी स्पर्धेत बुलढाण्याच्या प्रथमेश जवकारला सुवर्ण!
By संदीप वानखेडे | Published: May 21, 2023 11:04 PM2023-05-21T23:04:53+5:302023-05-21T23:05:26+5:30
प्रथमेशने सुरूवातीपासूनच चांगला खेळ करीत विश्वविजेत्या खेळाडूवर मात करण्यासाठी केवळ एक गुण गमावला.
बुलढाणा : जागतिक तिरंदाजी स्पर्धेत बुलढाण्याच्या प्रथमेश जवकारने शानदार प्रदर्शन करीत सुवर्ण पदक पटकावले. त्याने विश्वविजेत्या नेदरलॅंडच्या माइक श्लोएसरवर मात केली. शांघाई येथे सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताकडून बुलढाण्याचा १९ वर्षीय प्रथमेश जवकार सहभागी झाला आहे. त्याने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करीत उलटफेर करीत जगात पहिल्या क्रमांकावर असलेल्या माईक श्लोएसरवर मात करीत पुरुषांच्या कपाऊंड प्रकारात वैयक्तिक गटात सुवर्ण पदक जिंकले.
प्रथमेशने सुरूवातीपासूनच चांगला खेळ करीत विश्वविजेत्या खेळाडूवर मात करण्यासाठी केवळ एक गुण गमावला. पहिल्या फेरीत दोन्ही खेळाडूंनी समान २९ गुण मिळवले होते. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत दोन्ही तिरंदाज लक्ष्य भेदण्यात अपयशी ठरले. त्यानंतर पाचव्या फेरीत नेदरलॅंड खेळाडूने चूक केली. आणि त्याचा लाभ घेत प्रथमेशने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत आपले पहिले सुवर्ण पदक पटकावले.
गेल्या सहा वर्षांपूर्वी छत्तीसगडमध्ये झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत प्रथमेश चमकला होता. त्यात त्याने दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले होते. १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान हरियाणातील सोनीपत येथे तिरंदाजीच्या राष्ट्रीय संघाच्या निवड चाचणी उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्याची भारतीय तिरंदाजी संघात निवड झाली आहे.
---
शांघाई येथील स्पर्धेत सुवर्ण पटकावल्याचा आनंद आहे़ आगामी मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याचे स्वप्न आहे़ चार वर्षातून एकदा होणारी जागतिक तिरंदाजी स्पर्धा बर्लिन जर्मनी येथे होणार आहे. तसेच चीनमध्ये आशीयाई स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देण्याचा मानस आहे़
प्रथमेश जवकार, सुवर्ण पदक विजेता