मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे अडकली गाळात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 12:23 PM2021-06-07T12:23:37+5:302021-06-07T12:23:54+5:30
Buldhana News : पावासाळ्याच्या तोंडावर नगर पालिकांची स्वच्छतेची कामे सध्या संथगतीने सुरू आहेत.
- ब्रह्मानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पावासाळ्याच्या तोंडावर नगर पालिकांची स्वच्छतेची कामे सध्या संथगतीने सुरू आहेत. अनेक पालिकांकडे निधीची कमतरता असल्याने मान्सूनपूर्व नालेसफाईची कामेही गाळात अडकली आहेत. काही पालिकांकडून मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांनाही नियमीत स्वच्छतेच्या कामातच पूर्ण केल्याचे दाखविल्या जात आहे. कोरोना विषाणू संसर्गामूळे नगर पालिकांची कर वसूली झालेली नाही. अनेक पालिकांची घर पट्टी, पाणी पट्टीची थकीत कराची रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे पालिकांचे वर्षाचे आर्थिक नियाेजन काेलमडले आहे. त्याचा परिणाम नगर पालिकांकडून होणाऱ्या विविध कामांवर दिसून येत आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे, मात्र अनेक भागात अद्यापह कामांना सुरूवाती झालेली नाही. निधी नसल्याने मान्सूपूर्व कामेही स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून केली जात नसल्याचे दिसून येते.
बुलडाणा पालिकेची टोलवाटोलवी!
बुलडाणा शहराचा विस्तार १४ चौरस किमी आहे. बुलडाणा नगर पालिकेकडे जवळपास ११७ सफाई कर्मचारी आहेत. परंतू नगर पालिकेकडून स्वच्छतेच्या या कामाबाबत टोलटोलवी होत असल्याचे दिसून येते. शहरातील अनेक भागातील सांडपाण्याच्या नाल्या तुंबलेल्या आहेत. नियमीत कचरा गोळा करणारी वाहने शहरात फिरतात, परंतू मान्सूनपूर्व नालेसफाईचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मेहकर येथे पालिकेचे काम पूर्ण झाल्याचा दावा!
मेहकर नगर पालिकेने मान्सूनपूर्व कामे पूर्ण केल्याचा दावा करण्यात येत आहे. मेहकर नगर पालिकेकडे ७० सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. याठिकाणी मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे १५ व्या वित्त आयोगातून करण्यात आल्याची माहिती नगर पालिकेकडून देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक भागातील नाल्या घाणीने तुंबलेल्या दिसून येतात. शहरातील इमामवाडा चौक, गवळी पुरा, बाजार परिसर, कुरेशी मोहल्ला, लोणार वेस या भागातील सांडपाण्याच्या नाल्यांमध्ये गाळ तसाच अडकेला आहे.
बुलडाणा शहरातील नियमीत कचरा उचलणे व इतर सफाईची कामे सुरू आहेत. मान्सूनपूर्व कामांमध्ये नालेसफाईची कामे करण्यात येत आहेत. निधीची अडचण आहे.
सचिन लघाने, उपमुख्याधिकारी,
नगर पालिका, बुलडाणा.
मेहकर नगर पालिकेची मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. कंत्राटी कर्मचारी घेतलेले आहेत. १५ व्या वित्त आयोगातील निधीचाही वापर करण्यात येत आहे.
सचिन गाडे,
मुख्याधिकारी, नगर पालिका मेहकर.