दुग्धोत्पादकांना प्राधान्याने पतपुरवठा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 11:39 AM2021-05-30T11:39:08+5:302021-05-30T11:39:15+5:30

Buldhana News : दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना बँकांनी प्राधान्याने पतपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 

Preference will be given to dairy farmers | दुग्धोत्पादकांना प्राधान्याने पतपुरवठा करणार

दुग्धोत्पादकांना प्राधान्याने पतपुरवठा करणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्यावर्षी केंद्राने कृषी क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील दुग्धोत्पादकांना पशूंच्या संगोपनासाठी प्रती जनावर २० हजार रुपयांप्रमाणे महत्तम पातळीवर तीन लाख रुपयांपर्यंत पतपुरवठा करण्याच्या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजाणी झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांना बँकांनी प्राधान्याने पतपुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 
यासंदर्भात जिल्हा दूध संघ, बँकर्स समितीचे अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत २९ मे रोजी महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. त्यात उपरोक्त निर्देश देण्यात आले. या बैठकीस अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नरेश हेडाऊ, जिल्हा दूध संघाचे समाधान शिंगणे, संचालक रमेश पाटील, सहायक निबंधक रमेश भोयर (पदुम), जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचे सीईओ डॉ. अशोक खरात यांच्यासह अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. केंद्राने गेल्या वर्षी मे महिन्यात कृषी क्षेत्रासाठी एक लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. 
त्याअंतर्गत पशुपालन, मत्स्य व्यवसायासाठी १५ हजार कोटींची घोषणा केली होती. त्याअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील पशुपालनासाठी प्रती जनावर २० हजार रुपये प्रमाणे वित्तपुरवठा किसान क्रेडिट कार्डअंतर्गत करण्यात येणार होता. कमाल १५ गुरांसाठी तीन लाख रुपयांपर्यंतचा हा पतपुरवठा करण्याची मर्यादा होती; पण प्रत्यक्षात यासाठी बँकांकडे गेलेल्या प्रकरणांमध्ये अत्यल्प प्रमाणात पतपुरवठा झाला होता. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा दूध संघाच्या मार्फत दुग्धोत्पादन करणाऱ्या पशुपालकांना प्राधान्याने पतपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली होती. हा मुद्दा घेऊन २९ मे रोजी अनुषंगिक बैठक घेण्यात आली होती. त्यामुळे दुग्धोत्पादकांना प्राधान्याने पतपुरवठा करण्याबाबत अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी निर्देशित केले आहे. दरम्यान यापूर्वीच्या पतपुरवठ्याच्या परतफेडीसंदर्भातील अडचणीही यावेळी त्यांनी जाणून घेतल्या. जिल्हा दूध संघांतर्गत एकूण १५०० दूध उत्पादक शेतकरी सभासद आहेत.
 

Web Title: Preference will be given to dairy farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.