डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 04:05 PM2019-07-21T16:05:51+5:302019-07-21T16:05:56+5:30
बुलडाणा : जिल्ह्यातील सहा डेंग्यू संवेदनशील शहरांत जुलै, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील सहा डेंग्यू संवेदनशील शहरांत जुलै, आॅगस्ट, सप्टेंबरमध्ये डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. डास अळी सर्व्हेक्षण करुन जनजागृती केली जाणार आहे. सर्व्हेक्षणासाठी पथके नियुक्त करण्यात आली असून प्रत्येक पथकात दोन जणांचा समावेश राहील. इतर विभागांचीही मदत घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी एस. बी. चव्हाण यांनी दिली.
जून ते आॅक्टोंबर हा किटकजन्य रोगांसाठी पारेषण कालावधी असतो. या काळात सर्वच किटकजन्य रोगांचा प्रसार होत असतो. डेंग्यू सारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यात मागील वर्षी डेंग्यू रुग्णांमध्ये तुलनात्मक वाढ दिसून आली होती. डेंग्यू आजारावर प्रभावी व निश्चित औषधोपचार नाही.
डेंग्यू नियंत्रणासाठी ताप सर्व्हेक्षण, किटकशास्त्रीय सर्व्हेक्षण, कोरडा दिवस पाळणे, नागरिकांना शिक्षण देणे आदी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे हा एकमेव पर्याय आहे. शहरी भागांमध्ये डेंग्यू रुग्णांचे प्रमाण अधिक असल्यामुळे जिल्ह्यातील डेंग्यू संवेदनशिल शहरात जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जुलैमध्ये २२ ते २७, आॅगस्टमध्ये १९ ते २४ तर सप्टेंबरमध्ये १६ ते २१ दरम्यान सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.
डेंग्यू संवेदनशिल शहरांमध्ये बुलडाणा, चिखली, मेहकर, खामगाव, शेगाव, मलकापूरचा समावेश आहे. बुलडाणा येथे २२ , चिखली २१, मेहकर १८, खामगाव २९, शेगाव २७ व मलकापुरात ३० पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकामध्ये दोन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. घरोघरी जाऊन हे कर्मचारी नागरिकांना डेंग्यूबाबत जनजागृती करणार आहेत. आरोग्य सेवक, नगर पालिका कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविकांच्या मदतीने हे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे.
डेंग्यू प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. वैयक्तिक व परिसर स्वच्छता ठेवावी, घर व परिसरात डोसोत्पत्तीस्थाने असल्यास नष्ट करावी, आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस पाळावा. घरातील सर्व पाणी साठे कोरडे करुन ठेवावे. पाणी साठे घट्ट झाकून ठेवावे, उन्हाळ्यात वापरलेले कुलर स्वच्छ करुन कोरडे करावे, भंगार सामान, तुटलेली खेळणी, टायर्स, फुटलेल्या बादल्या, जुनी माठ, राजणे नष्ट करावी, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, लहान मुलांना अंगभर कपडे घाला, खिडक्यांना डासरोधक जाळी बसवा, परिसरातील डबकी बुजवावी, किंवा गप्पी मासे सोडावी, ताप आल्यास त्वरित वैद्यकिय सल्ला घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)