आयकर अधिकारी असल्याचे भासवले, २० लाखांच्या बदल्यात ४० लाखांच्या खोट्या नोटा देऊन फसवले
By सदानंद सिरसाट | Published: November 6, 2022 08:41 PM2022-11-06T20:41:01+5:302022-11-06T20:42:52+5:30
बनावट नोटा देऊन फसवले, चितोड्यातील तिघांना मुंबईत अटक
खामगाव (बुलढाणा) : आयकर अधिकारी असल्याचे भासवून कारवाईतील ४० लाख रुपये आहेत, ते घेऊन केवळ २० लाख रुपये द्या, असा बनाव करत पुण्यातील एकाची मुंबईत फसवणूक केल्याप्रकरणी खामगाव तालुक्यातील चितोडा अंबिकापूर येथील सरपंच पतीसह तिघांना माटुंगा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, मुख्य आरोपी असलेला सरपंच देवराव भाऊराव हिवराळे याच्याविरोधात राज्यभरात अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे.
पुणे येथील रामदास दत्तात्रय बल्लाळ यांनी मुंबईतील माटुंगा ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये आरोपींनी आयकर अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्याकडे कारवाईत जप्त केलेल्या नोटा आहेत. त्या बदलवून द्यायच्या आहेत. त्यासाठी २० लाख रुपयांच्या मोबदल्यात ४० लाख रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले. त्यासाठी बल्लाळ यांच्यासोबत मुंबईतील नामांकित व महागड्या ओबेरॉय, ट्रायडंट, प्रीतम हॉटेल याठिकाणी भेटी घेतल्या. तसेच बल्लाळ यांना मर्सिडिज, फॉर्च्युनरसारख्या आलिशान कारमधून फिरवले.
विश्वास संपादन झाल्यानंतर बल्लाळ यांच्याकडून २० लाख रुपये रोख घेण्यात आले. त्याबदल्यात त्यांना `भारतीय बच्चो का बँक' असे लिहिलेल्या बनावट नकली नोटा दिल्या. त्याद्वारे फिर्यादीची फसवणूक केली. याप्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक राहुल गौड, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप-निरीक्षक प्रशांत कांबळे, सहायक फौजदार जयेंद्र सुर्वे यांनी कौशल्यपूर्वक तांत्रिक तपास केला. त्यामध्ये चितोडा येथील सरपंच पती देवराव भाऊराव हिवराळे (३५), रविकांत जनार्दन हिवराळे (३६), योगेश वासुदेव हिवराळे (३२) यांना अटक केली. तर त्यांच्यासोबतचा एक आरोपी फरार झाल्याची माहिती आहे.
- दहा जणांची टोळी
आमिष देऊन फसवणूक करण्याचा गोरखधंदा राज्यभरात करण्यासाठी या टोळीमध्ये दहा जण असल्याची माहिती आहे. तर मुंबईतील फसवणुकीच्या घटनेत चौघांचा समावेश आहे. त्यापैकी तिघांनाच अटक झाली. चवथा फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
- राज्यातील अनेक ठाण्यात गुन्हे दाखल
मुंबईत अटक केलेला मुख्य आरोपी देवराव भाऊराव हिवराळे याच्याविरुद्ध राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. आराेपींनी आणखी किती जणांची फसवणूक केली, याचा तपासही माटुंगा पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे आता आरोपींचे सर्वच गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.