डेंग्यू आजारावर प्रतिबंध हाच उपाय- शिवराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 05:35 PM2020-07-25T17:35:07+5:302020-07-25T17:42:56+5:30
जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद...
- संदीप वानखडे
बुलडाणा : दरवर्षी पावसाळ््यात डेंग्यूसह इतर जलजन्य आजारांची साथ पसरते. यावर्षी कोरोनामुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. प्रशासनाचे सर्व लक्ष कोरोना संसर्ग थांबविण्याकडे असल्याने डेग्यू, मलेरिया या आजारांकडे दुर्लक्ष होतेय का, या आजारांना रोखण्यासाठी काय उपाय योजना करण्यात येत आहेत, याविषयी जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, डेंग्यू, मलेरिया व इतर आजारांकडे दुर्लक्ष होत आहे का?
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही डेंग्यू व इतर आराजांच्या प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज आहे. डेंग्यू रोखण्यासाठी आम्ही तीन महिन्यांचा प्लान तयार करून त्यानुसार काम करीत आहोत.
जिल्ह्यात आतापर्यंत डेग्यूंचे किती रुग्ण आहेत?
जिल्ह्यात आतापर्यंत १५ रुग्णांची नोंद आहे. वर्षभरात मे-जून महिन्यात सर्वाधिक रुग्ण आढळले होते. तेव्हा उपाय योजना केल्याने डेंग्यूच्या रुग्णांची वाढ थांबली आहे. यापुढेही विभागाच्या वतीने विविध उपाय योजना केल्या आहेत.त्यामध्ये सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.
डेंग्यु थांबविण्यासाठी काय उपाय योजना करण्यात येत आहेत?
तीन महिन्यांचा अॅक्शन प्लॉन तयार करून डेंग्यूचे हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी तपासणी करण्यात आली. तसेच ज्या गावांमध्ये रुग्ण आढळले, त्या गावांवर लक्ष केंद्रीत केले आहे. आतापर्यंत हॉटस्पॉट ठरलेल्या जवळपास सर्वच गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले आहे. काही गावांमध्ये सर्वेक्षण थांबलेले आहे. ते लवकरच पूर्ण करण्यात येईल. तसेच खासगी लॅब,हॉस्पीटलला भेट देउन डेंग्यू रुग्णांविषयी माहिती घेण्यात येत आहे. प्रतिबंध हाच एकमेव उपाय असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. नागरिकांनी घरात स्वच्छ पाणी उघड्यावर ठेवूच नये. तसेच पावसाळ््यात उत्पत्ती स्थाने वाढल्याने एडीस डासांची निर्मीती होते. त्यामुळे, धोका जास्त असतो.
एडीस डासांविषयी काय सांगाल?
एडीस डास पाच ते सहा मिमी लांबीचा असतो. अंगावर पांढरे चट्टे असतात. हा डास स्वच्छ पाण्यातच वाढतो. त्यामुळे, पाण्याची भांडी, ड्रम, रांजन व्यवस्थीत झाकून ठेवावे. खराब टायर्स नष्ट करावे. आठवड्यातून प्रत्येक शनिवार कोरडा दिवस पाळावा. डेंग्यूचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असतो. कारण त्यांची प्रतीकार शक्ती कमी असते. त्यामुळे, एडीस किंवा इतर मच्छर घरात येणारच नाही, अशी खबरदारी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी सतर्क रहावे.
प्रतिबंध हाच एकमेव उपाय असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. नागरिकांनी घरात स्वच्छ पाणी उघड्यावर ठेवूच नये. तसेच पावसाळ््यात उत्पत्ती स्थाने वाढल्याने एडीस डासांची निर्मीती होते. त्यामुळे, धोका जास्त असतो.