तूर डाळीचे भाव घटले; परवानाधारक त्रस्त!
By admin | Published: September 1, 2016 02:34 AM2016-09-01T02:34:24+5:302016-09-01T02:34:24+5:30
डाळ खरेदीस स्वस्त धान्य दुकानदार नकार दर्शवत आहेत.
विवेक चांदूरकर
बुलडाणा, दि. ३१: जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने स्वस्त धान्य दुकानांतर्गत लाभार्थींना वाटप करण्याकरिता दोन कोटी रुपयांची तूर डाळ खरेदी करण्यात आली. मात्र, अचानक तूर डाळीचे भाव बाजारात पडल्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार सदर डाळ खरेदी करण्यास नकार देत आहेत.
जिल्ह्यात जवळपास १४३६ स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानांतर्गत अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थींना तूर डाळीचे वाटप करण्यात येते. या लाभार्थींंना तूर डाळीचे वाटप करण्याकरिता जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने १0३ रुपये प्र ितकिलो दराने दोन कोटी रुपयांच्या तूर डाळीची खरेदी करण्यात आली. ही तूर डाळ लाभार्थींना वाटण्यात येणार आहे. मात्र, बाजारात तुरीच्या डाळीचे भाव ८0 रुपयांपासून तर ९५ रुपयांपर्यंंत आहेत. त्यामुळे ग्राहक स्वस्त धान्य दुकाना तून तूर डाळ खरेदी करण्याऐवजी बाजारातून खरेदी करेल. परिणामी स्वस्त धान्य दुकानातील डाळीची खरेदी होणार नाही. नेहमीप्रमाणे जिल्हा पुरवठा विभागातील तूर डाळ स्वस्त धान्य दुकानदारांनी खरेदी केली, तर त्यांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार ही तूर डाळ खरेदी करण्यास नकार देत आहे. मात्र, आगामी दिवसांमध्ये पोळा, गणेश उत्सव, गौरी पूजन, नवदुर्गा उत्सव असल्यामुळे प्रत्येक लाभार्थीला शिधापत्रिकेवर एक किलो तूर डाळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना डाळ खरेदी करावीच लागणार आहे. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना नुकसानाचा सामना करावा लागणार आहे.
सणांसाठी साखरेसह धान्यसाठा मुबलक उपलब्ध
आगामी महिनाभर सण, उत्सव असल्यामुळे साखरेसह अन्य धान्यसाठा स्वस्त धान्य दुकानांमध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात आला आहे.