आवक घटल्याने कांद्यासह भाज्यांचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:29 AM2021-01-13T05:29:26+5:302021-01-13T05:29:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : आवक घटल्याने कांद्यासह सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. लग्नसराईमुळे वांग्याला मागणी वाढली आहे. फळांचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आवक घटल्याने कांद्यासह सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. लग्नसराईमुळे वांग्याला मागणी वाढली आहे. फळांचा सीझन संपत आल्याने दरवाढ झाली आहे. खाद्यतेलही चार ते पाच रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांना महागाईची झळ सहन करावी लागत आहे.
बाजारात भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. कांदा ५० रुपये किलाेवर पाेहोचला आहे. हिरवी मिरची ६० रुपये किलाे तर वांगे ४० रुपयांवर पाेहोचले आहेत. आवक घटल्याने मेथी, पालकचे दर वाढले आहेत. फळबाजारात सफरचंद, माेसंबी, संत्रा आदींची आवक माेठ्या प्रमाणात कमी झाल्याने जवळपास दुप्पटीने दर वाढले आहेत. किराणा साहित्यामध्ये तेलाचे दर वाढल्याचे चित्र आहे.
सफरचंद २४० रुपयांवर
गत आठवड्यापासून फळांची आवक घटली आहे. त्यामुळे, फळांच्या दरात माेठी वाढ झाली आहे. इरानी सफरचंद २४० रुपये प्रतिकिलाेने विकले जात आहे. तसेच डिलक्स सफरचंद १४० रुपये प्रतिकिलाेने विकले जात आहे. माेसंबीचे दरही माेठ्या प्रमाणात वाढले आहे. डाळिंबला गत आठवड्यात ६० रुपयांपर्यंत दर मिळाला. या आठवड्यात डाळिंबाचे भाव १५० रुपयांवर गेले आहेत. पपई व संत्र्यांच्या दरातही वाढ झाली आहे.
भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दरवाढ झाली आहे. कांदा, मिरची व इतर भाज्यांचे दर वाढले आहेत.
- संजय इंगळे, भाजी विक्रेता
सीझन संपल्याने गत आठवड्यापासून फळांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे, सफरचंद, माेसंबी, डाळिंब, पपईचे दर वाढले आहेत. येत्या काही दिवसांत दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
- मुशीर बागवान, फळ विक्रेता
खाद्यतेल वधारले
दिवाळीपासून खाद्यतेलाचे दर माेठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चार ते पाच रुपयांनी तेल महाग झाले आहे. फल्ली तेल १५९ रुपये तर साेयाबीन तेल १२९ रुपये प्रतिकिलाेवर दर गेले आहेत. मकरसंक्रांत जवळ आल्याने गूळ आणि तिळाचे दरही वाढले आहेत.