कोरोना’चा प्रसार थांबविणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य - डॉ. निलेश टापरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 06:32 PM2020-04-11T18:32:13+5:302020-04-11T18:32:34+5:30
खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्याशी साधलेला संवाद...
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कोरोना या विषाणूजन्य आजाराने जगभर हाहाकार माजविला आहे. कोरोना हा विषाणू प्रामुख्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीशी ती खोकताना किंवा शिंकताना संपर्क आल्यास पसरतो. त्यामुळे संपर्क टाळणे आणि कोरोनाचा प्रसार थांबविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश टापरे यांच्याशी साधलेला संवाद...
कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी उपाययोजना काय?
कोरोना हा आजार प्रामुख्याने संपर्कातून तसेच विषाणू असलेल्या वस्तूला स्पर्श करून त्यानंतर तिच्या डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करतो त्यावेळी हा आजार पसरतो. या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी संपर्क टाळणे जितके गरजेचे आहे, तितकेच वारंवार हात धुणे गरजेचे आहे. खोकताना आणि शिंकताना टिशूने नाक झाकून घ्यावे. हात स्वच्छ नसल्यास नाकाला किंवा तोंडाला स्पर्श करू नये. तसेच आजारी असलेल्या रूग्णांशी नजीकचा संपर्क टाळा.
कोरोनाच्या अनुषंगाने उपजिल्हा रूग्णालयात उपलब्ध सुविधा काय ?
कोरोना या विषाणूचे संशयीत रूग्ण खामगाव आणि परिसरात आढळून आल्यानंतर कोरोना संसर्गाच्या रूग्णासाठी आयसोलेशन कक्ष तयार करण्यात आला. सुरूवातीला या कक्षात १० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, संभाव्य परिस्थिती आणि धोका लक्षात घेता आयसोलेशन कक्षात आणखी ४० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने रूग्णालयात विशेष पथक कार्यरत आहे का?
अजिबात नाही, रूग्णालयात कार्यरत असलेला स्टापच आयसोलेशन कक्षात दाखल रूग्णांची काळजी घेत आहे. योग्य तो औषधोपचार त्यांच्यावर करण्यात येत आहे. सोबतच संशयीत रूग्णांची वेळीच नोंद घेत, कम्युनिटी स्प्रेडचा धोका टाळण्यासाठी रूग्णालय प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. रूग्णालयाच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी समाधान व्यक्त केले आहे.‘
कोरोना म्हणजेच कोविड-१९ हा नवीन विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा फ्यू सारखा संसर्गजन्य आजार असून, खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. सुरूवातीला काही दिवस ही लक्षणे दिसून येत नाहीत.
खामगाव येथून किती रूग्णांचे अहवाल पाठविले?
कोरोना या विषाणूचे संक्रमन वाढीस लागल्यानंतर खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयातून १६ जणांचे स्वाब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यापैकी आतापर्यंत १५ जणांचे अहवाल प्राप्त झालेत. आनंदाची बाब म्हणजे या सर्वच १५ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर एक अहवाल सद्यस्थितीत प्रलंबित आहे. शुक्रवारी एका वयोवृध्द महिलेचा आयसोलेशन कक्षात मृत्यू झाला. खबरदारी म्हणूनही या महिलेचाही स्वाब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. उपजिल्हा सामान्य रूग्णालयाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.