प्रधानमंत्री पीक विमा योजना आता आॅनलाइन!
By admin | Published: July 14, 2017 12:48 AM2017-07-14T00:48:48+5:302017-07-14T00:48:48+5:30
प्रस्ताव आॅनलाइन सादर करता येणार!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील नऊ पिकांकरिता पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना आता शेतकऱ्यांना सुलभ व सोप्या पद्धतीने विमा काढता यावा, याकरिता आॅनलाइन करण्यात आली आहे.
या योजनेनुसार पिकांना मिळालेल्या विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देता येते. या योजनेचे अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना सुलभता मिळणे व गावपातळीवर पूरक नोंदणी सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षीपासून योजनेचे प्रस्ताव आॅनलाइन स्वीकारण्यात येणार आहे. अर्ज व विमा हप्ता कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत. याकरिता राज्यात सीएससीई गव्हर्नस सर्व्हिसेस इंडिया लि. द्वारे कार्यान्वित आपले सरकार सेवा केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यावर्षीपासून योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव तयार करतेवेळी आधार कार्ड व फोटो असलेल्या खातेपुस्तकाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक केले आहे.
आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधार कार्ड नोंदणी पावतीसोबत मतदान ओळखपत्र, किसान क्रेडिट कार्ड, नरेगा जॉबकार्ड किंवा वाहन चालक परवाना यापैकी एक फोटो ओळखपत्र सादर करावे. कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँक कर्ज खात्याशी आधार क्रमांक जोडण्याकरिता त्वरित बँकेशी संपर्क करावा. त्याचप्रमाणे बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमूद करावा लागणार आहे.
योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखिम स्तर ७० टक्के, असा निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्याची अंतिम तारिख ३१ जुलैपर्यंत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.
आतापर्यंत पीक विम्याची रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या घरात मिळाली आहे.