जानेफळ येथील शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापकाची कार्यालयातच आत्महत्या
By संदीप वानखेडे | Updated: March 27, 2024 18:34 IST2024-03-27T18:34:38+5:302024-03-27T18:34:54+5:30
सकाळच्या सत्रात सुरू असलेली शाळा सुटल्यानंतर सर्व शिक्षक आपल्या घरी निघून गेले होते तसेच मुख्याध्यापक रत्नाकर गवारे हे कार्यालयात काम करत होते आणि शिपाई वर्गखोल्या बंद करण्याचे काम करत होते.

जानेफळ येथील शिवाजी हायस्कूलच्या मुख्याध्यापकाची कार्यालयातच आत्महत्या
जानेफळ : स्थानिक शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक शिवाजी रत्नाकर गवारे यांनी शाळेच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २७ मार्च रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळच्या सत्रात सुरू असलेली शाळा सुटल्यानंतर सर्व शिक्षक आपल्या घरी निघून गेले होते तसेच मुख्याध्यापक रत्नाकर गवारे हे कार्यालयात काम करत होते आणि शिपाई वर्गखोल्या बंद करण्याचे काम करत होते. शिपाई आपले काम करून कार्यालयात वर्गखोल्यांच्या कुलुपाच्या चाव्या ठेवण्यासाठी परतले असता, त्यांना मुख्याध्यापक रत्नाकर गवारे हे नायलॉन दोरीने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे त्यांनी घाबरून जात मोठ्या हिमतीने शिक्षकांना मोबाइलवर संपर्क करत माहिती दिली.
त्यानंतर शिक्षकांनी शाळेत पोहोचत संस्थाध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांना माहिती दिली. त्यामुळे सर्वांनी शाळेत धाव घेऊन पोलिसांना कळवले. या घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथे रवाना केला आहे. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.