राष्ट्रसंतांच्या साहित्यातील ईश्वरीय तत्त्व म्हणजे राष्ट्रभक्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 01:56 AM2017-11-27T01:56:28+5:302017-11-27T01:57:00+5:30
बुलडाणा : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून जीवनाचे सार सांगितले असून, यांना अभिप्रेत धर्म राष्ट्रधर्म होता, त्यांनी व्यवसायनिहाय कर्तव्य व धर्माची भूमिका मांडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेतून जीवनाचे सार सांगितले असून, यांना अभिप्रेत धर्म राष्ट्रधर्म होता, त्यांनी व्यवसायनिहाय कर्तव्य व धर्माची भूमिका मांडली. त्यांनी सांगितलेले ईश्वरीय तत्त्व म्हणजे राष्ट्रभक्ती होय, असे ईश्वरीय तत्त्व प्रत्येक व्यक्तीमध्ये असते. या तत्त्वानुसार प्रत्येक व्यक्तीचे मार्गक्रमण केल्यास जीवनाचे सार्थक होते, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.शांताराम बुटे यांनी केले.
स्थानिक पंकज लद्दड इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँण्ड मॅनेजमेंट स्टडिज, बुलडाणा व भारतीय विचार मंच, विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने पाचवे विदर्भस्तरीय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलन २६ नोव्हेंबर रोजी पार पडले. या साहित्य संमेलनाच्या वंदनीय राष्ट्रसंतांच्या साहित्यातील अध्यात्मबोध या विषयावर दुपार्या सत्रात परिसंवाद घेण्यात आला. यावेळी परिसंवादाचा आढावा घेताना सत्राध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या परिसंवादात डॉ.विकास बाहेकर यांनी ग्रामगीतेतील धर्म संकल्पना, प्रा.मोरेश्वर देशमुख यांनी राष्ट्रसंताच्या भजनातील ईश्वरभक्ती व अरुण नेटके यांनी अतिउच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो, या विषयावर विवेचन केले. यावेळी परिसंवादात सहभागी वक्ते डॉ.विकास बाहेकर यांनी सांगितले, की ग्रामगीतेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी सांगितलेला धर्म हा राष्ट्रधर्म सांगितलेला आहे. जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्ती या संकल्पनेनुसार वाटचाल करीत असतो; मात्र ग्रामगीतेतील धर्म प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रधर्म शिकविणारा आहे. या धर्मानुसार राष्ट्रधर्मामध्ये व्यवसायनिहाय कर्तव्य करून जीवन जगण्याची भूमिका मांडली आहे.
राष्ट्रसंतांनी हा धर्म गाव, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडून नवीन प्रेरणा देण्याचे काम केले असल्याचे सांगितले. परिसंवादात सहभागी दुसरे वक्ते प्रा. मोरेश्वर देशमुख यांनी राष्ट्रसंतांच्या भजनातील ईश्वरभक्तीविषयी आपले मत मांडताना सांगितले, की प्रत्येक व्यक्तीमध्ये ईश्वरीय तत्त्व आहे. तसेच प्रत्येक व्यक्तीने प्रत्येकामध्ये ईश्वरीय तत्त्व बघितले पाहिजे. या ईश्वरीय तत्त्वानुसार जीवन व्यथित करणे म्हणजे ईश्वरभक्ती होय. अशा राष्ट्रभक्ती शिकविणार्या ईश्वरभक्तीशिवाय जीवनाचा उद्धार होणार नाही, अशी भूमिका प्रा.देशमुख यांनी मांडली. तिसरे वक्ते अरुण नेटके यांनी अतिउच्चतम जीवन बने, परमार्थमय व्यवहार हो, याबाबत विवेचन करताना जीवनाच्या आश्रमाचे वर्णन केले. यावेळी त्यांनी ब्रम्हचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास आश्रमातील प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्याविषयी माहिती देऊन प्रत्येक व्यक्तीने चांगले जीवन जगण्यासाठी या अवस्थेतील बदलाचा स्वीकार करून परमार्थ साधण्याचे आवाहन केले. यावेळी भारतीय विचार मंचचे प्रा.सुभाष लोहे यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन राम सोनुने यांनी केले.