नागरिकत्त्व कायद्याविरोधात जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 02:59 PM2020-01-18T14:59:47+5:302020-01-18T15:00:06+5:30

शांतता आणि न्याय मोहिम (कॅम्पेन आॅफ पीस अ‍ॅण्ड जस्टिस इन इंडिया) या संघटनेच्यावतीने १७ जानेवारी रोजी स्थानिक जयस्तंभ चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले

Prison agitation against the citizenship law | नागरिकत्त्व कायद्याविरोधात जेलभरो आंदोलन

नागरिकत्त्व कायद्याविरोधात जेलभरो आंदोलन

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : केंद्रातील भाजप सरकारने पारित केलेल्या नागरिकत्त्व संशोधन कायदा व अनुषंगिक सीएए, एनपीआर या कायद्याच्या विरोधात जिल्हाभरात मोर्चे, धरणे आंदोलने करण्यात आले. या विरोधात शांतता आणि न्याय मोहिम (कॅम्पेन आॅफ पीस अ‍ॅण्ड जस्टिस इन इंडिया) या संघटनेच्यावतीने १७ जानेवारी रोजी स्थानिक जयस्तंभ चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण देशभरात वादंगाचा विषय ठरलेल्या या कायद्याच्या विरोधात बुलडाणा जिल्ह्यात व्यापक प्रमाणात आंदोलने करण्यात आले. विविध राजकीय पक्ष सामाजिक, धार्मिक संघटनांनी जवळपास सर्व तालुकास्थळी व मोठ्या गावांमध्ये सुद्धा मोर्चे काढण्यात आले. डिसेंबरअखेर राज्यातील महाविकास आघाडीने जिल्हाभर आंदोलन केले. यानंतर बहुजन क्रांती मोर्चाने काढलेला मोर्चा देखील लक्षवेधी ठरला आहे. या पाठोपाठ ‘सीपीजे’ संघटनेने आक्रमक पवित्रा घेत थेट जेलभरो आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन स्थानिक जयस्तंभचौक येथे करण्यात आले.
यावेळी एनआरसी, सीएए, एनपीआर कायद्याविरोधात घोषणांनी जयंस्तभ चौक परिसर दणाणून सोडला होता. मोहम्मद सिफात शेख अस्लम, जाकीर कुरेशी, उमेद देशमुख, शब्बीर कुरेशी, डॉ. मुबीज खान, जावेद अली खान, मोहम्मद सोहिल, शेख अफतर, मोहसिन कुरेशी, शेहबाज हुसेन, सैय्यद अनिल यांच्या नेतृत्वात हे जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांना पोलिस व्हॅनमधून स्थानिक पोलिस स्टेशनमाध्ये आनल्यानंतर त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.
यावेळी या आंदोलनात अनेक मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान कुठलीही अनुचित घटना होऊ नये, यासाठी पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
(प्रतिनिधी)

Web Title: Prison agitation against the citizenship law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.