तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांनी सज्ज राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:33 AM2021-05-24T04:33:48+5:302021-05-24T04:33:48+5:30

चिखली : शहरातील खासगी कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर झालेल्या कथित आरोपांनी डॉक्टरांनी निराश न होता संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ...

Private doctors should be prepared against the backdrop of the third wave | तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांनी सज्ज राहावे

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर खासगी डॉक्टरांनी सज्ज राहावे

Next

चिखली : शहरातील खासगी कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर झालेल्या कथित आरोपांनी डॉक्टरांनी निराश न होता संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

संपूर्ण जगात हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाची देशात दुसरी लाट सुरू असून तज्ज्ञांच्या माहितीनुसार लवकरच तिसरी लाटदेखील येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना़ डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखली शहरातील खासगी कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांची महत्त्वपूर्ण बैठक स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी खासगी हॉस्पिटलला व डॉक्टरांना येणाऱ्या अडीअडचणी पालकमंत्री महोदयांनी जाणून घेतल्या. डॉक्टरांवर व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत, असे म्हणत डॉक्टर मंडळी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या या संकट काळात रुग्णसेवा देत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी, नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी डॉक्टरांचा योग्य तो सन्मान करावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. यावेळी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तिसऱ्या लाटेपासून बचावासाठी काय काय उपाययोजना केल्या पाहिजे याबाबत डॉक्टरांकडून माहिती जाणून घेतली. तिसरी लाट ही लहान मुलांकरिता त्रासदायक ठरू शकते त्यामुळे बालरोगतज्ज्ञांनी यासाठी आपापले रुग्णालय सज्ज ठेवावे, त्यांच्यावर आवश्यक तो औषधोपचार करून योग्यप्रकारे त्यांचा उपचार होईल याची काळजी घ्यावी, अशा सूचना ना़ डॉ. शिंगणे यांनी दिल्या.

यावेळी चिखली मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुहास खेडेकर, डॉ. सुहास तायडे, डॉ. शिवशंकर खेडेकर, डॉ. रामेश्वर दळवी, डॉ. संतोष सावजी, डॉ. भारत पानगोळे, डॉ. पंढरी इंगळे, डॉ. कृष्णा खंडागळे, डॉ. प्रियेश जैस्वाल, डॉ. नीलेश गोसावी, डॉ. मंगेश मिसाळ, डॉ. अजय अवचार, डॉ. प्रकाश शिंगणे, डॉ. सुशांत पाटील उपस्थित होते.

Web Title: Private doctors should be prepared against the backdrop of the third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.