खासगी कोवीड रुग्णालयांचेही होणार ऑडीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 04:34 PM2020-09-27T16:34:17+5:302020-09-27T16:34:40+5:30
आॅडीट करण्याच्या सुचना अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहे.
बुलडाणा: खासगी कोवीड रुग्णालयांचेही आता आॅडीट करण्याच्या सुचना अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिल्या आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात २६ सप्टेंबर रोजी घेतलेल्या दीर्घ बैठकीमध्ये कोवीड संदर्भाने उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. त्यावेळी या सुचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी एस. राममुर्ती, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, जिल्हा शल्यचिकित्सत डॉ. सुरेश घोलप, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी कांबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी आर. जे. सांगळे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, खासगी रुग्णालयात उपचार घेतलेल्या प्रत्येक बाधीत रुग्णाच्या देयकाचेही आॅडीट करण्यात येणार असून त्यासाठी स्वतंत्र आॅडीटरच्या नियुक्त्या करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पुणे, नागपूरच्या धर्तीवर हे आॅडीट करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्ह्यात अद्याप कोणाची तक्रार आली नसली तरी स्वयंस्फुर्तपणे ही भूमिका स्वीकारण्यात आली असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात चिखली, देऊळगाव राजा येथील दोन खासगी रुग्णालयात कोवीडवर उपचार करण्यास मान्यता देण्यात आलेली असून आणखी एका खासगी रुग्णालयास लवकरच मान्यता देण्यात येणार आहे.
दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यात आॅक्सीजन सिलींडरची कमतरता पाहता आणखी ६०० सिलींडर उपलब्ध करण्यात येत असून ते उपलब्ध झाल्यास जिल्ह्यातील एकूण १२०० सिलींडर उपलब्ध होती. त्यामुळे रिकाम्या सिलींडरचे रोटेशन करणे शक्य होणार आहे. हा मुद्दा सातत्त्याने ‘लोकमत’ने गेल्या काही दिवसापासून उचलला आहे. त्यानुषंगाने ही हालचाल जाली आहे.
विद्युत दाहीनीचा प्रश्न मार्गी
बुलडाणा येथे विद्युत दाहीनी उभारण्यासंदर्भात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या मागणीचाही पाठपुरावा करण्यात येत असून जवळपास सव्वा कोटी रुपये खर्चाची विद्युत दाहीनी बुलडाण्यात उभारण्यासंदर्भात आढावा बैठकीत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. त्यानुषंगाने मुख्यमंत्र्याच्या होणाऱ्या व्हीसीमध्येही प्रकर्षाने हा मुद्दा मांडण्यात येणार असल्याचे संकेत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
डॉक्टर भरतीबाबत मार्गदर्शन घेणार
कोवीडचे संक्रमण जिल्ह्यात वाढत असून आॅक्टोबरमध्येही मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्ग वाढणार असल्याचे आयसीएमआरचे संकेत पाहता जिल्ह्यातल डॉक्टरांची कमतरता भासणार नाही, यासाठी डॉक्टरांची भरती करणे गरजेचे झाले आहे. त्यानुषंगाने राज्यशासनाकडून मार्गदर्शन घेण्यात येणार असून हा प्रश्नही त्वरित निकाली काढण्यासाठी प्राधान्य दिल्या जाणार असल्याचे ते म्हणाले. सध्या डॉक्टरांचाहा प्रश्न गंभीर आहे. आरोग्य विभागात रिक्तपदे आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी तथा दर्जेदार उपचार करण्यासाठी ही बाब गरजेची आहे.
राज्य आपत्ती निवारणकडे निधीची मागणी
राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाकडून कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. त्यासंदर्भाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. वर्तमान स्थितीत राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाकडून निधी उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे हा प्रश्नही त्वरित निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.