‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:17+5:302021-06-01T04:26:17+5:30
पुणे येथील स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धा मागील चार वर्षांपासून घेण्यात येते. स्वातंत्र्यवीर ...
पुणे येथील स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ‘मी सावरकर’ वक्तृत्व स्पर्धा मागील चार वर्षांपासून घेण्यात येते. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिनानिमित्त ही स्पर्धा घेण्यात आली होती. दरम्यान, यामध्ये ८२ गावांबरोबरच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, थायलंड, कतारसारख्या परदेशातूनही सहाशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल सावरकरांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला २५ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला होता, तर स्पर्धेचे बक्षीस वितरण सावरकर यांच्या जयंतीला झाले. या स्पर्धेत गट क्रमांक एक इयत्ता पाचवी ते आठवीमधून बुलडाणा येथील प्रबोधन विद्यालयाची विद्यार्थिनी रचना योगेंद्र गुळवे हिने सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या विषयांवर उत्कृष्ट वक्तृत्व सादरीकरण केले. त्यामध्ये रचना गुळवे या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक मिळविला. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजित केला होता. परंतु कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता तो रद्द करून स्मृतिचिन्ह आणि बक्षिसाच्या रकमेचा धनादेश कुरियरने पाठवण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला. त्यानंतर स्वातंत्र्यवीरांच्या जयंती दिनी हे बक्षीस रचना गुळवे हिला देण्यात आले. कोरोनामुळे बक्षीस वितरणाचा हा सोहळा कौटुंबीक स्तरावरच झाला.
देशपातळीवरील स्पर्धेत चमकले बुलडाण्याचे नाव
बुलडाणा येथील रचना गुळवे या विद्यार्थिनीमुळे देशपातळीवरील स्पर्धेत बुलडाण्याचे नाव चमकल्याचे मनोगत, रचनाच्या सत्कारप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केले. रचना गुळवेला बक्षीस देऊन तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी मिलिंद चिंचोळकर, सुनील गवई, अजित गुळवे, कार्तिक गुळवे आदी उपस्थित होते.