खामगाव पालिकेत ऑनलाइन सभेच्या निरोपावरून सत्ताधारी-विरोधक ऑफलाइन भिडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 11:40 AM2020-09-04T11:40:24+5:302020-09-04T11:40:36+5:30
सभेच्या निरोपावरून विरोधी नगरसेवक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच आॅफलाइन जुंपली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक नगर पालिकेची विशेष आॅनलाइन सभा गुरूवारी आयोजित करण्यात आली. मात्र, या सभेच्या निरोपावरून विरोधी नगरसेवक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच आॅफलाइन जुंपली. त्यामुळे खामगाव नगर पालिकेतील गुरूवारी चांगलेच तापले होते. यावेळी भाजप नगरसेविका चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. विरोधी सदस्यांसोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची सुध्दा यावेळी घडली.
खामगाव शहराची दुसरी सुधारीत विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २१ अन्वये जाहीर इरादा प्रसिध्दीबाबत आणि नगर पालिकेतील सफाई कामगारांना शासकीय सुटीच्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला देण्यासाठी तयार केलेल्या उपविधीच्या मसुद्यास मान्यता प्रदान करण्याबाबत विचार विनिमय करून निर्णय घेण्यासंदर्भात आॅनलाइन सभा आयोजित करण्यात आली. सभेचा निरोप पालिकेतर्फे सर्वच नगरसेवकांना दिला गेला. मात्र विषय सूचीवर सभा आॅनलाइन असल्याचा उल्लेख नव्हता. सभेचा निरोप मिळाला नसल्याचे कारण पुढे करीत विरोधी सदस्य पालिका सभागृहात पोहोचत त्यांनी नगराध्यक्षांना निषेध केल्याने गोंधळ सुरू झाला. याचवेळी नगराध्यक्षांसह काही नगरसेविकाही दालनात आल्याने भाजप आणि विरोधी नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. त्यामुळे पालिकेचे वातावरण तापले होते. नगराध्यक्षा अनिता डवरे, संतोष पुरोहित, लता गरड, दुर्गा हट्टेल, राजेंद्र धनोकार उपस्थित होते. विरोधी सदस्य आॅनलाइन सभेला उपस्थित होते, मात्र, आंदोलनासाठी ते लगेच बाहेर पडले.
नगराध्यक्षांच्या खुर्चीला घातला हार
आॅनलाइन सभेच्या गोंधळावरून निर्माण झालेल्या वादामुळे विरोधी नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घातला. त्यामुळे पालिकेत एकच गोंधळ निर्माण झाला. विरोधी नगरसेवकांना सभागृह सोडण्यास भाग पाडले. यावेळी काँग्रेस गटनेते अमेय सानंदा, राष्ट्रवादी काँग्रेसचे देवेंद्र देशमुख, भारिपचे विजय वानखडे, सरस्वती खासने, भूषण शिंदे यांच्यासह विरोधी नगरसेवकांनी तीव्र घोषणाबाजी केली.
विरोधाला विरोध म्हणून नव्हे, तर विरोधी सदस्यांचा जाणिवपूर्वक नेहमीच सभा असली की, गोंधळ सुरू असतो. विकास कामांना विरोध करण्याची त्यांना सवयच जडली असून, महिला नगराध्यक्षांचा त्यांच्याकडून वारंवार अवमान केल्या जातो. खूर्चीला हार घालून प्रश्न सुटनार नाही. विरोधी सदस्यांनी आपले वर्तन बदलावे.
- अनिताताई डवरे, नगराध्यक्षा, खामगाव.