बोटांचे ठसे न उमटणाऱ्या वृध्दांना ‘स्मार्ट कार्ड’साठी अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 03:42 PM2019-08-12T15:42:49+5:302019-08-12T15:43:14+5:30
बोटांचे ठसे न उमटणाºया अनेक जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डसाठी अडचणी येत आहेत.
रफिक कुरेशी
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार लिंक असलेले डिजीजल स्मार्ट कार्ड काढणे सुरू आहे. आतापर्यंत मेहकर आगारामधून २ हजार १७३ जेष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र बोटांचे ठसे न उमटणाºया अनेक जेष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्डसाठी अडचणी येत आहेत.
राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या प्रवासासाठी अर्धे तिकिटाची सुविधा देण्यात येते. मात्र आधार कार्ड, मतदान कार्डमध्ये खोडातोड करुन अनेकजण ज्येष्ठ नागरिकांच्या नावावर सुविधा घेऊन शासनाची फसवणूक करीत आहे. त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सुरू केली आहे.
एसटी महामंडळाकडून आधार लिंक असलेले डिजिटल स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येत आहे. आधार कार्ड काढण्यासाठी बसस्थानकावर सकाळी सहा वाजतापासूनच मोठ्या प्रमाणावर जेष्ठ नागरिक व महिलांची गर्दी होत आहे. मेहकर आगारात आतापर्यंत अंदाजे दोन हजार नागरिकांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे.
मात्र अनेक महिला व पुरुषांचे बोटांचे ठसे उमटत नसल्याचे दिसून आले. बोटांचे ठसे न उमटल्यामुळे ओळख जुळत नाही; परिणामी रांगेत उशिरापर्यंत उभे राहिल्यानंतरही काही नागरिकांना घरी परत जावे लागत आहे.
यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ज्येष्ठ नागरिकांचे अंगठे स्कॅन होत नसल्याने आम्ही काहीच करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. शासनाने तात्काळ यासंदर्भात ज्येष्ठ नागरिकांची ही अडचण दूर करून पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
एसटी महामंडळाच्या कॅशलेस व्यवहाराकरीता सुरू करण्यात आलेले स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या अंगठ्याचे ठसे उमटत नसल्याची अडचण आहे. काही वेळा तांत्रिक अडचणी निर्माण होते.
- रणवीर कोळपे,
आगारप्रमुख मेहकर