येळ कोट येळ कोट जय मल्हारच्या गजरात शिव खंडोबाची मिरवणूक
By अनिल गवई | Published: December 24, 2023 12:09 PM2023-12-24T12:09:41+5:302023-12-24T12:09:49+5:30
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबारायाची रविवारी सकाळी स्थानिक शिवाजी वेस भागातील पुरातन शिव खंडोबा मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली.
खामगाव: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबारायाची रविवारी सकाळी स्थानिक शिवाजी वेस भागातील पुरातन शिव खंडोबा मंदिरातून मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक वाद्याच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत भाविकांनी ठिकठिकाणी ठेका धरत, पिवळ्या भंडार्याची उधळण केली. तसेच येळ कोट येळ कोट जय मल्हारचा गजर केला.
येथील शिवाजी वेस भागात श्री शिव खंडोबा पुरातन मंदिर आहे. या मंदिरात शिव खंडोबाचे वर्षाकाठी १० ते १२ उत्सव साजरे केले जातात. यंदा बुधवार १३ डिसेंबरपासून शिव खंडोबा नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने सुरूवात करण्यात आली. त्यानंतर सोमवार १८ डिसेंबर रोजी चंपाषष्ठी तळी भरण्याचा कार्यक्रम झाला. शनिवार २३ डिसेबर रोजी श्रींचे जागरण कार्यक्रम पार पडला. यात गणेश कदम आणि संच यांनी भारूड सादर केले.
त्यानंतर वाघे मंडळीचा भजनाचा कार्यक्रम झाला. रविवारी पहाटे श्रींचा लग्नसोहळा पार पडल्यानंतर शिवाजी वेस भागातून जेजुरी गडावरून अभिषेक करून आणलेल्या श्रीं खंडेरायाच्या २७१ किलो आणि ७ फुटाच्या िपतळी मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी वेस, फरशी, बालाजी प्लॉट, अग्रसेन चौक, महावीर चौक, जगदंबा छत्र, मुख्य रोड मार्गे फरशी आणि शिवाजी वेस भागात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. या मिरवणुकीत देवाचे मानकरी, खांदेकरी, निशाणधारी महिला आणि भाविक तसेच श्री शिव खंडोबा भक्त मंडळ, श्री शिव खंडोबा महिला भजनी मंडळ, श्री छत्रपती शिवाजी महाराज वेस परिसरातील नागरिक मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते.
पारंपारिक वाद्यावर अनेकांनी धरला ठेका
डीजेमुक्त मिरवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी श्री शिव खंडोबा मंडळाच्यावतीने पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढली. या मिरवणुकीत सहभागी मातृशक्तीसह युवक आणि बालगोपालांनीही ठेका धरला.