राज्यात तिळाचे उत्पादन निम्यावर; मकर संक्रातीला तिळाचा तुटवडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 03:03 PM2018-01-13T15:03:52+5:302018-01-13T15:05:41+5:30
बुलडाणा : मकर संक्रात आली की तिळाची उलाढाल वाढते; मात्र राज्यातील तिळ पिकाचे क्षेत्र सरासरी क्षेत्रापेक्षा निम्याने घटल्याचे दिसून येत आहे. राज्यात खरीप हंगामात तिळ पिकाचे सरासरी क्षेत्र ३८ हजार २०२ हेक्टर असून प्रत्यक्ष १७ हजार १२३ हेक्टर क्षेत्रावरच तिळाचे उत्पादन घेण्यात आले आहे. ५५ टक्के क्षेत्रावरील तिळ कमी झाल्याने या मकर संक्रातीला तिळाची चणचण जाणवत आहे.
ब्रम्हानंद जाधव/बुलडाणा :
मकर संक्रात आली की तिळाची उलाढाल वाढते; मात्र राज्यातील तिळ पिकाचे क्षेत्र सरासरी क्षेत्रापेक्षा निम्याने घटल्याचे दिसून येत आहे. राज्यात खरीप हंगामात तिळ पिकाचे सरासरी क्षेत्र ३८ हजार २०२ हेक्टर असून प्रत्यक्ष १७ हजार १२३ हेक्टर क्षेत्रावरच तिळाचे उत्पादन घेण्यात आले आहे. ५५ टक्के क्षेत्रावरील तिळ कमी झाल्याने या मकर संक्रातीला तिळाची चणचण जाणवत आहे.
मकर संक्रातीला ‘तिळ गुळ’ बनविण्यासाठी तिळाचे महत्व जास्त असते. मकर संक्रातीलाच तिळाचा सण म्हणून ओळखले जाते. तिळाचे महत्व असलेल्या मकर संक्रातीच्या १५ दिवस अगोदरपासूनच राज्यभर तिळाच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल सुरू होते. खरीप हंगामात उत्पादन घेतलेला तिळ मकर संक्रातीच्या मुहूर्तावर वापरल्या जातो. महाराष्ट्रात तिळाचे सरासरी क्षेत्र ३८ हजार २०२ हेक्टर आहे. गेल्या चार वर्षापूर्वी संपूर्ण क्षेत्रावर तिळाची पेरणी करून १०० टक्के उत्पादन घेतले जात होते. मात्र, आता राज्यात तिळाचे क्षेत्र निम्याने घटल्याचे चित्र दिसून येत आहे. ३८ हजार २०२ हेक्टर क्षेत्रापैकी २०१७ मध्ये केवळ १७ हजार १२३ हेक्टर क्षेत्रावरच तिळाचे उत्पादन घेण्यात आले आहे. तर २०१६ मध्ये सुद्धा तिळाचे क्षेत्र कमीच म्हणजे २१ हजार १९४ हेक्टर क्षेत्रावरच राहिले. राज्यात खरीप हंगामातील तिळाचे क्षेत्र ५५ टक्क्याने घसरल्याने मकर संक्रातीसारख्या सणाच्या मुहूर्तावर तिळाचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे तिळाचे भावही वाढले आहेत.
पश्चिम विदर्भात २ हजार ६७३ हेक्टरवर तिळ
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात तिळाचे उत्पादन कमी झाले आहे. अमरावती विभागात एकूण ४ हजार ४२१ हेक्टर क्षेत्र तिळ पिकाखाली असून त्यापैकी केवळ २ हजार ६७३ हेक्टर क्षेत्रावरच तिळाचे उत्पादन घेण्यात आले. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात १ हजार ३५० हेक्टर, अकोला जिल्ह्यात ५५, वाशिम जिल्ह्यात ५२, अमरावती जिल्ह्यात १२ आणि यवतमाळ जिल्ह्यात ६७ हेक्टरवर खरीप हंगामात तिळ उत्पादन घेण्यात आले आहे.
भावातही तफावत
तिळाच्या भावातही सध्या बाजार समित्यानुसार तफावत दिसून येते. बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या खामगाव येथे तिळाला ५ हजार ३०० ते ८ हजार ५०० रुपये प्रतिक्ंिवटल भाव मिळत आहे. तर नांदुरा येथील बाजार समितीमध्ये ६ हजार ते ७ हजार २०० रुपये व शेगाव येथे ६ हजार ५०० ते ७ हजार ७०० रुपये प्रति क्वीविंटल भाव आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये ५ हजार ५०० ते ८ हजार २५० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत आहे.