बंदिस्त शेळीपालनातून युवकाने साधली प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:37 AM2021-08-23T04:37:05+5:302021-08-23T04:37:05+5:30
मेहकर: शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शहापूर येथील युवकाने शेळीपालनाचा व्यवसाय निवडून बंदिस्त पद्धतीने शेळीपालन करून प्रगती साधली आहे. दुष्काळी ...
मेहकर: शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शहापूर येथील युवकाने शेळीपालनाचा व्यवसाय निवडून बंदिस्त पद्धतीने शेळीपालन करून प्रगती साधली आहे. दुष्काळी परिस्थितीतही खचून न जाता त्याने आपल्या जिद्दीला परिश्रमाची जोड देत इतर युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
मेहकर तालुक्यातील शहापूर येथील सुभाष अशोकराव काळे यांच्याकडे १५ एकर शेती आहे. मात्र अस्मानी संकटामुळे शेतीमधील उत्पन्नाची हमी ही पुसट झाली आहे. यामुळे शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करीत असतानाच शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालनाचा व्यवसाय सुभाष काळे यांनी निवडला. अल्प शिक्षण असून, तीन वर्षांपासून एका शेळीपासून या व्यवसायाला सुरुवात केली. आज रोजी त्यांच्याकडे २३ मोठ्या शेळ्या आहेत, तर ४० लहान पिल्ले आहेत. देशी शेळ्या सांभाळून त्यावर जमनापरी बोकडाचा क्रॉस केल्याने तयार झालेली वंशावळ ही उत्तम प्रकारची असल्याने त्यांना बाजारातसुद्धा चांगला भाव मिळाला आहे. या व्यवसायामध्ये त्यांना आई, वडील, पत्नी हे सहकार्य करीत आहेत. १५ एकर शेतीचे नियोजन करून ट्रॅक्टरचा व्यवसाय सांभाळून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सुभाष काळे यांनी शेळीपालनामध्ये युवकांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
योग्य चाऱ्याचे नियोजन...
हिरव्या चाऱ्यामध्ये मेथी घास, मका, शाळू याची पेरणी केली. या चाऱ्याची कुट्टी करण्यासाठी कडबाकुट्टी यंत्राचा उपयोग केला जातो. तर कोरड्या चाऱ्यामध्ये तूर, हरभरा, सोयाबीन, भुईमूग, मूग या पिकांचे कुटाराचा वापर केला जातो.