निलंबनाविरोधात निषेध मोर्चा
By admin | Published: November 14, 2014 12:10 AM2014-11-14T00:10:26+5:302014-11-14T00:10:26+5:30
काँग्रेसने केले आ.बोंद्रे यांचे सर्मथन
चिखली (बुलडाणा) : राज्यपाल महोदयांना धक्काबुक्की झाल्याच्या कारणावरून चिखलीचे काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांच्यासह पाच आमदारांना निलंबित केल्याने चिखली मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही दंडूकेशाही असल्याचे आरोप करीत १३ नोव्हेंबर रोजी काँग्रेस व युवक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी तोंडाला काळे कपडे बांधून निषेध मोर्चा काढला.
आ. राहुल बोंद्रे यांचे निलंबन झाल्यानंतर मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयाकडे धाव घेतली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराला स्मरण करून विधानसभेत आमदारकीची शपथ घेणारे व आपल्या पहिल्याच विजयी सभेत महात्मा गांधी यांच्या विचारानुसार पुढील वाटचाल करण्याचा संकेत देणारे आमदार राहुल बोंद्रे विधान भवनाच्या पायर्यांवर राज्य पालांना सभागृहात घडलेला प्रकार सांगण्याच्या व निवेदन देण्याच्या प्रयत्नात असताना निलंबित करण्यात आले. याचा कॉंग्रेस कार्यकर्त्यांना जबर धक्का बसला आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत आवाज उठविणार्या व सरकारला अडचणीचे वाटणार्या आमदारांना हेतुपुरस्सरपणे बाजूला सारण्याच्या उद्देशाने ही मुस्कटदाबी केली असल्याचा आरोप करीत तोंडावर काळय़ा पट्टय़ा बांधून निषेधा र्थ मोर्चा काढला.