नुकसानीचा तातडीने सर्व्हे करा : गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:41 AM2021-09-08T04:41:40+5:302021-09-08T04:41:40+5:30
मोताळा व बुलडाणा तालुक्यामध्ये पावसाने सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याचा फटका अनेक ठिकाणी पिकांना बसला असून पिकांचे ...
मोताळा व बुलडाणा तालुक्यामध्ये पावसाने सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याचा फटका अनेक ठिकाणी पिकांना बसला असून पिकांचे नुकसान झालेले आहे. याच बरोबर मोताळा तालुक्यातील रिधोरा - चिंचपूर नदीवरील पूल वाहून गेल्याने या गावाचा संपर्क तुटला आहे. यांसदर्भात आ. संजय गायकवाड यांनी परदेशी यांना तालुक्यामध्ये भेटी देऊन संबंधित भागाचा सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोताळा तालुक्यामध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण हे नगण्य होते; परंतु मागील काही तासांमध्ये तालुक्यामध्ये प्रचंड पाऊस झाल्यामुळे तालुक्यामधील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे बहुतांश पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे; परंतु नद्या भरून वाहत असल्यामुळे नदीकाठची पिके संपूर्ण खरडून गेली आहेत. नदीकाठची अनेक घरेसुद्धा पाण्यामध्ये वाहून गेली आहेत.
नळकुंड येथील नुकसानग्रस्तांना दिली मदत
नळकुंड येथील नुकसानग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी पाच हजार मदत व अन्नधान्याच्या किटचे आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याबाबतीत जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बुलडाणा, संबंधित तहसीलदार त्यांच्याशी चर्चा करून तातडीने सर्व्हे करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शासन दरबारी याचा पाठपुरावा करून शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करू, असे सुद्धा गायकवाड यांनी स्पष्ट केले.