सैलानी दर्ग्यासाठी ४ हेक्टर जमीन संपादनाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:40 AM2021-08-14T04:40:31+5:302021-08-14T04:40:31+5:30
गेल्या ११९ वर्षांपासून होळीदरम्यान सैलानी येथे सैलानी बाबांची यात्रा भरत असते. त्यामुळे महाराष्ट्रासह लगतच्या राज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. ...
गेल्या ११९ वर्षांपासून होळीदरम्यान सैलानी येथे सैलानी बाबांची यात्रा भरत असते. त्यामुळे महाराष्ट्रासह लगतच्या राज्यात ही यात्रा प्रसिद्ध आहे. येथे दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सैलानी बाबा दर्ग्यालगतची जमीन संपादित करण्यासंदर्भात प्राथमिकस्तरावर आता प्रस्ताव आला आहे. ही जमीन सैलानी बाबा अस्थाई बाबा ट्रस्टचे अध्यक्ष अब्दुल समद यांनी संपादित करून देण्याची मागणी १७ फेब्रुवारी २०२१ रोजी एका पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. सोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महसूलमंत्री यांनाही दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयास अधिकृतस्तरावर अनुषंगिक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने १६ जुलै २०२१ रोजी दिल्या आहेत. दरम्यान, पिंपळगाव सराई ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या या दर्ग्याचा कारभार हा महाराष्ट्र वक्फ बोर्डामार्फत नियुक्त केलेल्या अस्थाई ट्रस्टद्वारे चालविण्यात येतो. त्यानुषंगाने या अस्थाई ट्रस्टला अनुषंगिक प्रस्ताव अधिकृतस्तरावर पाठविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
---
२०१३ च्या भूसंपादन कायद्यानुसार यासंदर्भात कार्यवाही करता येणार आहे. याबाबत अधिकृतस्तरावर अनुषंगिक प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. प्रस्ताव आल्यानंतर त्यासंदर्भाने कायद्याच्या चौकटीत राहून कार्यवाही करता येईल.
(भूषण अहिरे, जिल्हा भूसंपादन अधिकारी, बुलडाणा)