खामगावात आणखी तीन वाढीव कोविड केअर सेंटरसाठी प्रस्ताव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 11:13 IST2020-07-15T11:13:19+5:302020-07-15T11:13:27+5:30
खामगाव शहरात आणखी तीन कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत.

खामगावात आणखी तीन वाढीव कोविड केअर सेंटरसाठी प्रस्ताव!
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना संक्रमित रूग्णांची फुगत चाललेली आकडेवारी लक्षात घेता, खामगाव शहरात आणखी तीन कोरोना केअर सेंटर कार्यान्वित करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. त्यादृष्टीकोनातून आता महसूल प्रशासनाने प्रयत्न चालविले आहेत.
कोरोना-१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. दरम्यान, खामगाव येथील कोविड केअर सेंटरवर खामगाव उपविभागातील खामगाव आणि शेगाव तालुक्यासोबतच मलकापूर उपविभागातील मलकापूर, नांदुरा शहरातील कोरोना संक्रमित रूग्ण आणि त्यांच्या हायरिक्स संपर्कातील व्यक्तींना क्वारंटीन ठेवण्यात येते. सद्यस्थितीत खामगाव येथे समाजकल्याण मुलांचे वसतीगृह, आदिवासी मुलींचे वस्तीगृह, पिंपळगाव राजा रोड, घाटपुरी हे दोनच कोविड केअर सेंटर कार्यान्वित आहेत. तथापि, रूग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता, खामगाव येथे आणखी तीन कोविड केअर सेंटर लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
वाढीव दोन सीसीसी केंद्रासाठी प्रस्ताव!
जलंब रोडवरील अल्पसंख्याक मुलांचे वस्तीगृह आणि अल्पसंख्याक मुलींचे वस्तीगृह वाडी येथे नवीन दोन सीसीसी केंद्र कार्यान्वित करण्यासोबतच वाडी रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन येथेही सीसीसी केंद्र कार्यान्वित करण्याच्या प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत.
वाढीव सीसीसी सेंटरसाठी संभाव्य इमारतींमध्ये उपाययोजना करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यापैकी दोन वाढीव केंद्र लवकरच कार्यान्वित केले जातील. या केंद्राच्या मान्यतेसाठी प्रस्तावही पाठविण्यात आला आहे.
- डॉ.शीतलकुमार रसाळ
तहसीलदार, खामगाव.