प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या प्रस्ताव आता ऑनलाईन
By admin | Published: July 11, 2017 07:28 PM2017-07-11T19:28:00+5:302017-07-11T19:28:00+5:30
आपले सरकार सेवा केंद्रात प्रस्ताव ऑनलाईन सादर करता येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील नऊ पिकांकरिता पंतप्रधान पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार पिकांना मिळालेल्या विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देता येते. या योजनेचे अर्ज भरण्यास शेतकऱ्यांना सुलभता मिळणे व गावपातळीवर पूरक नोंदणी सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे यावर्षीपसून योजनेचे प्रस्ताव ऑनलाईन स्वीकारण्यात येणार आहे.
अर्ज व विमा हप्ता कॉमन सर्वीस सेंटर मार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे. याकरीता राज्यात सीएससीई गव्हर्नस सर्व्हिसेस इंडिया लि. द्वारे कार्यान्वीयीत आपले सरकार सेवा केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावर्षीपासून योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव तयार कतेवेळी आधारकार्ड व फोटो असलेल्या खातेपुस्तकाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक केले आहे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावतीसोबत मतदान ओळखपत्र, किसान क्रेडीट कार्ड, नरेगा जॉबकार्ड किंवा वाहन चालक परवाना यापैकी एक फोटो ओळखपत्र सादर करावे. कर्जदार शेतकऱ्यांनी आपले बँक कर्ज खात्याशी आधार क्रमांक जोडण्याकरीता त्वरित बँकेशी संपर्क करावा. त्याचप्रमाणे बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमुद करावा लागणार आहे.
योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखिम स्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्याची अंतिम तारिख 31 जुलै 2017 पर्यंत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.