समृद्धीच्या प्रगतीची गती मंदावली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:34 AM2021-04-18T04:34:11+5:302021-04-18T04:34:11+5:30
सिंदखेडराजा : राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या समृध्दी महामार्गाच्या कामाची गती काही अंशी मंदावल्याने चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रदिनी नागपूर ...
सिंदखेडराजा : राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या समृध्दी महामार्गाच्या कामाची गती काही अंशी मंदावल्याने चित्र आहे. त्यामुळे महाराष्ट्रदिनी नागपूर ते शिर्डी सुरू होणारा हा महामार्ग पुढील काही महिने तरी सुरू होणार नाही अशी शक्यता व्यक्त होत आहे. काेराेनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मजुरांनी समृद्धी महामार्गावर काम करीत असलेल्या परराज्यातील मजूर स्थलांतर करीत असल्याने काम प्रभावित झाले आहे़
मुंबई ते नागपूर समृध्दी महामार्गाचे काम गेल्या काही वर्षात गतीने सुरू आहे. मागील सरकारमध्ये या महामार्गाला मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मागील वर्षी कोरोनाने अनेक महिने काम बंद राहील अशी स्थिती होती, पण कामाची गती कायम ठेवण्यात अधिकारी, अभियंते यशस्वी ठरले़ परंतु सरतेशेवटी कोरोना प्रादुर्भाव कमी होत नसल्याने महाराष्ट्रातून मजुरांचे जे स्थलांतर झाले त्यात समृद्धीच्या कामावरील मजुरांची संख्या मोठी होती. बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १० टक्के मजुरांनी काम सोडून उत्तर प्रदेश, बिहारकडे कूच केले. मागील वर्षी गेलेले हे मजूर पुन्हा परत न आल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील समृद्धीच्या कामावर झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात ८७ किमीचा हा महामार्ग असणार आहे. मुख्यत्वे राहेरी जवळील पूर्णा नदीवरील पूल अद्याप पूर्ण नाही तर अनेक ठिकाणचे अंडरपास, पूल अपूर्ण असल्याने पुढील चार महिने तरी महामार्ग वाहतुकीला खुला होऊ शकणार नाही. सद्यस्थितीत मजूर नसल्याने १५ ते २० टक्क्याने कामाची गती मंदावली असल्याचे समृद्धीच्या अधिकृत सूत्रांकडून समजते.