बेशरमची झाडे लावून खामगाव नगर पालिका प्रशासनाचा निषेध
By अनिल गवई | Published: April 17, 2023 01:53 PM2023-04-17T13:53:39+5:302023-04-17T13:53:58+5:30
खामगाव: शहरातील मुलभूत समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्या जात आहे. वारंवार निवदेन देऊनही सर्वसामान्यांची कामे होत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी एआयएमआयएमच्यावतीने ...
खामगाव: शहरातील मुलभूत समस्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्या जात आहे. वारंवार निवदेन देऊनही सर्वसामान्यांची कामे होत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी एआयएमआयएमच्यावतीने रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावून नगर पालिका प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनाचामुळे खामगाव नगर पालिकेत एकच खळबळ उडाली आहे.
खामगाव शहरातील निळकंठ नगर मधून ईदगाहकडे जाणार्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी एआयएमआयएमच्यावतीने ३१ मार्च रोजी करण्यात आली. यासंदर्भात नगर पालिका प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले. मात्र, नगर पालिका प्रशासनाकडून रमजान ईदपूर्वी खड्डे बुजविण्यात आले नाहीत, रस्त्यावरील काटेरी वृक्ष न तोडता स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाच्या निषेधार्थ टिळक राष्ट्रीय विद्यालय, शौकत कॉलनी, डॉ. वराडे यांचा दवाखाना, मस्तान चौक आदी ठिकाणी बेशरमची झाडे लावून निषेध नोंदविला. या आंदोलनात माजी नगरसेवक मो. आरिफ पहेलवान, सईद मिर्झा, यासीन पठाण, मो. शाकू, रज्जाक कुरेशी, राजीक खान, मो. नवेद, मो. मुजम्मील आदींचा सहभाग होता.
सामान्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
गत काही दिवसांपासून नगर पालिका प्रशासनाचा कारभार ढेपाळला आहे. मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकार्यांच्या अनुपस्थित नगर पालिकेतील कर्मचारी, अधिकारी दांड्या मारतात. त्यामुळेच सर्व सामान्यांच्या समस्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप एआयएमआयचे शहराध्यक्ष मो. आरिफ पहेलवान यांनी निवेदनातून केला आहे.