पोलिसांच्या निषेधार्थ सोनाळ्यात कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 01:53 PM2018-11-29T13:53:14+5:302018-11-29T14:36:35+5:30
सोनाळा पोलिसांनी पोलीस अधीक्षकांना चुकीचा अहवाल सादर करीत गावाची बदनामी केल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली आहेत.
सोनाळा ता. संग्रामपूर - सोनाळा पोलिसांनी पोलीस अधीक्षकांना चुकीचा अहवाल सादर करीत गावाची बदनामी केल्याने व्यापाऱ्यांनी गुरुवारी दिवसभर आपली दुकानं बंद ठेवली आहेत. गावकऱ्यांच्यावतीने सोनाळा बंदची हाक देण्यात आली होती. त्यास व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला.
सोनाळा येथे श्री सोनाजी महाराज यात्रा महोत्सव सुरू आहे. ही यात्रा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. येथे सर्व धर्माचे लोक एकजुट येऊन सोनाजी महाराजांचा हा भव्य उत्सव पार पाडतात. शेकडो वर्षापासून सुरू असलेली ही यात्रा आजतागायत अबाधित सुरू आहे. पोलिसांच्या चुकीच्या अहवालाने यात्रेला गालबोट लागल्याने गावकरी आक्रमक झाले. २६ नोव्हेंबर रोजी सोनाळा यात्रेत लोकनाट्य मंडळ आले. पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. २७ नोव्हेंबररोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान ग्रा.प. पदधिकारी सदस्य, तंटामुक्ती समिती सदस्य गावकऱ्यांसह ठाणेदारांना भेटले. त्यानंतर २७ नोव्हेंबररोजी दुपारी 3 वाजता दरम्यान लोकनाट्य मंडळाचे काही संचालक व गावातील एक शिष्ट मंडळ पोलीस अधिक्षक बुलढाणा यांना भेटायला गेले.
पोलीस अधीक्षकांनी सर्वांना सोबत चर्चा करीत सोनाळा पोलिसांच्या अहवालाचा उल्लेख करीत सांगितले की गाव अतिसंवेदशील असुन त्याठिकाणी वाद होण्याची संभावना असल्याचे नमुद केले. त्यामुळे पोलिस प्रशासन लोकनाट्य तमाशाला परवानगी देऊ शकत नाही. बुलढाणा येथे चर्चा सुरू असताना लोकनाट्य कलाकारांनी संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान वाद्य वाजवण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी नागरीकांची गर्दी झाली होती. सोनाळा पोलिसांनी कलाकारांना वाद्य बंद पाडण्यास भाग पाडले. त्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. शेकडो वर्षापासून शांततेत व राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिक असलेल्या या सर्व धर्मीय यात्रेला गालबोट लागले. पोलिसांचा कायम यात्रा बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी गुरुवारी व्यापाऱ्यांनी नागरिकांची सोनाळा बंद हाक मान्य करीत दुकाने बंद ठेवली. यात्रा सुरू असताना गावातील एकही दुकान सुरू नसल्याचे दिसून येते.