संग्रामपूर तहसीलमध्ये शेतकऱ्यांचा बैठा सत्याग्रह
By विवेक चांदुरकर | Published: March 12, 2024 05:19 PM2024-03-12T17:19:45+5:302024-03-12T17:22:26+5:30
संग्रामपूर तालुक्यात २२ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले.
विवेक चांदूरकर, बुलढाणा : खरडून गेलेल्या शेतीचा मोबदला मिळाला नसल्यामुळे एकलारा येथील लाभापासून वंचित असलेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात १२ मार्च रोजी बैठा सत्याग्रह केला.
संग्रामपूर तालुक्यात २२ जुलै २०२३ रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले. त्यामध्ये एकलारा येथील शेतकऱ्यांची शेती खरडून गेली. शेतीसोबतच पीकेही वाहून गेली. त्यामुळे शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली.
शेतकऱ्यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले. मात्र ज्यांची शेती खरडून गेली, ते लाभार्थी शासनाच्या अनुदानापासून वंचित आहेत. याबाबत संबंधित विभागाला अनेकदा मागणी केल्यावरही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पूरग्रस्तांना लाभ मिळावा यासाठी ११ मार्च रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयात बैठा सत्याग्रह करून निवेदन देण्यात आले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत कार्यालयात बसून राहणार असा निर्णय शेतकर्यांनी घेतला. सर्वे करणाऱ्या अधिकारी यांनी जाणीवपूर्वक खरे नुकसानग्रस्त शेतकर्यांना वंचित ठेवल्याचा आरोप करीत संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची जमीन खरडून गेल्याचा मोबदला द्यावा, अशी मागणी करण्यात आली. बैठा सत्याग्रहात शेतकऱ्यांसह महिला सहभागी झाल्या होत्या.