आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखले; संतप्त शेतकऱ्यांचे रस्त्यावरच अर्धनग्न ठिय्या आंदोलन
By सदानंद सिरसाट | Published: January 1, 2024 06:12 PM2024-01-01T18:12:59+5:302024-01-01T18:13:13+5:30
सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी
सदानंद सिरसाट : खामगाव, जि. बुलढाणा: विविध मागण्यांसाठी बोरी अडगाव येथून निघालेला शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा पोलिसांनी बाजार समिती यार्डासमोर रोखून धरला. यामुळे शेतकरी संतप्त झाले. सरकार विरोधी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी रस्त्यावरच अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी आंदोलक शेतकरी व पोलिसांमध्येच जुंपली होती.
रेनगेज यंत्र किती एरिया (डायमीटर) व्यापते, याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना नसल्याने दुष्काळ व पीकविम्याची समस्या आहे. तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पीकविमा १०० टक्के मिळावा, यलो मोझॅक मुळे झालेल्या नुकसानीची मदत तत्काळ व सरसकट द्यावी, वन्यप्राण्यांपासून पिकाच्या रक्षणाला तार कुंपणाला १०० टक्के अनुदान मिळावे, मन प्रकल्पातील पाणी रब्बी हंगामात परिसरातील सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी मिळावे, रेशन मिळत नसलेल्या शेतकऱ्यांना नियमित मिळावे, शेताचे पाणंद रस्ते मोकळे करून भरण्यात यावे, पिंपरी मोहदर (उजाड) शेत शिवार अडगाव ग्रामपंचायतला जोडावे, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल सादर करून त्वरित नुकसानभरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी तालुक्यातील बोरी अडगाव येथे २७ डिसेंबरपासून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू होते. मात्र, शासन प्रशासनाने या आंदोलनाची कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी गावातून ट्रॅक्टर मोर्चा काढला.
२८ ट्रॅक्टरमध्ये बसून शेकडो शेतकरी खामगावच्या दिशेने निघाले. दुपारी शेतकऱ्यांचा हा मोर्चा खामगावात दाखल होताच विकमसी चौकातील बाजार समिती यार्ड समोर पोलिसांनी बॅरिकेड्स लावून मोर्चा अडवला. यावेळी पोलिस व शेतकऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली होती. मात्र, पोलिस सर्व ट्रॅक्टर घेऊन जाऊ देत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावरच अंगावरील कपडे काढून बसून अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.