बालकांना चांगल्या सुविधा द्या- महाले
By admin | Published: July 4, 2017 12:10 AM2017-07-04T00:10:27+5:302017-07-04T00:10:27+5:30
नियोजित जागेवरच तत्काळ अंगणवाडी बांधण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : मेहकर तालुक्यातील चायगाव येथे अंगणवाडीसाठी निधी मंजूर होऊन अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आलेले नाही. त्यामुळे तत्काळ नवीन अंगणवाडीचे बांधकाम करा व बालकांना चांगल्या सुविधा द्या, अशा सूचना जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आपल्या गावच्या विकासासाठी गावकऱ्यांनी सदैव पुढे आले पाहिजे, असे सांगितले.
चायगाव येथील अंगणवाडीतील मुले शाळेच्या आवारात बसतात. यासंदर्भात पालकांनी बहिष्काराचा इशारा दिला होता. याबाबत लोकमतने ३ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी तत्काळ घेऊन ३ जुलै रोजी चायगाव येथे भेट देऊन अंगणवाडीची पाहणी केली.
चायगाव येथे अंगणवाडी क्रमांक दोनसाठी नवीन खोली बांधकामासाठी निधी मंजूर झालेला आहे; मात्र ज्या नियोजित जागेवर खोली बांधकाम मंजूर झाले आहे. त्यावरून गावात मतभेद असल्याने खोली बांधकाम रखडले आहे. त्यामुळे सदर अंगणवाडीतील मुले ही जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बसतात व पावसाळ्याच्या दिवसात मुलांना त्रास होत असल्याने नवीन अंगणवाडी खोलीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा मुलांना अंगणवाडीत पाठविणार नाही व अंगणवाडीवर बहिष्कार टाकू, असा इशारा पालकांनी दिला होता. याची तत्काळ दखल घेऊन जि.प.महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी चायगावला भेट देऊन अंगणवाडीची पाहणी केली, तसेच मंजूर असलेली अंगणवाडी नियोजित जागेवर तत्काळ बांधण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेशरे, बालविकास प्रकल्प अधिकारी आर.के.सपकाळ, सरपंच श्रीकृष्ण देशमुख, श्वेता महाले यांचे स्वीय सहायक मोतीराम चव्हाण, सेविका अनिता माल, मदतनीस विद्या देशमुख, गावातील गणेश शेळके, गोपाल देशमुख, शंकर देशमुख, बाळू सरोदे, शिवाजी सहाने, पंजाबराव देशमुख उपस्थित होते.