टाळेबंदीत बारा बलुतेदारांना आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:26 AM2021-04-29T04:26:16+5:302021-04-29T04:26:16+5:30
देऊळगाव राजा : कोरोना संसर्गाचा राज्यभर वाढता प्रभाव पाहता शासनाने ५ एप्रिलपासून टाळेबंदी जाहीर केली आहे़; त्यामुळे बारा बलुतेदारांचा ...
देऊळगाव राजा : कोरोना संसर्गाचा राज्यभर वाढता प्रभाव पाहता शासनाने ५ एप्रिलपासून टाळेबंदी जाहीर केली आहे़; त्यामुळे बारा बलुतेदारांचा व्यवसाय बंद पडला असून, त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे़ अशा संकटसमयी शासनाने बारा बलुतेदारांना पाच हजार रुपये आर्थिक मदत तत्काळ द्यावी, अशी मागणी भाजपच्या ओबीसी आघाडीने एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी आघाडीने तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राज्य शासनाने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी टाळेबंदी जाहीर केली़ या दरम्यान व्यवसाय बंद पडलेल्या काहींना आर्थिक पॅकेज जाहीर केले़ मात्र न्हावी, सुतार, शिंपी, परीट, कुंभार या छोट्या जातींतील परंपरागत व्यवसायांद्वारे कुटुंबाची गुजराण करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे़ हे व्यवसाय बंद पडल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची पाळी आलेली आहे़ अशा संकटाच्या वेळी मायबाप शासनाने बारा बलुतेदारांना किमान पाच हजार रुपये आर्थिक मदत तत्काळ द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे़ निवेदन देताना भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेश कार्यकारी सदस्य निशिकांत भावसार, गजानन निकम, धनराज हनुमंते, प्रवीण बन्सीले, संजय तिडके, दिलीप शेजुळकर, दीपक वैद्य, विवेक खांडेभराड, वैभव कोरडे, विठोबा मुंडे, आदींची उपस्थिती होती़