मराठी भाषा संवर्धनासाठी साडेसात लाखांची तरतूद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:57 AM2018-01-01T01:57:07+5:302018-01-01T01:58:11+5:30
बुलडाणा: पूर्वी र्मयादित स्वरूपात म्हणजे २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनालाच मराठी भाषेचा कळवळा दिसून येत होता; मात्र आता मराठी भाषा संवर्धनास प्राधान्य देण्यात येत असून, त्यातच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत मराठी विभागाकडून वर्षभर ‘मराठी भाषा संवर्धन उपक्रम’ राबविण्यात येत आहे.
ब्रम्हानंद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पूर्वी र्मयादित स्वरूपात म्हणजे २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिनालाच मराठी भाषेचा कळवळा दिसून येत होता; मात्र आता मराठी भाषा संवर्धनास प्राधान्य देण्यात येत असून, त्यातच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत मराठी विभागाकडून वर्षभर ‘मराठी भाषा संवर्धन उपक्रम’ राबविण्यात येत आहे. मराठी भाषा संवर्धनासाठी अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून वर्षभरासाठी ७ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. त्यामुळे मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने आता पावले पुढे पडू लागली आहेत.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या पृष्ठभूमीवर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ही बाब समोर आली. महाराष्ट्रात मराठी भाषेचा शासकीय, व्यावहारिक कामकाज यासह सर्व क्षेत्रात पूर्णपणे वापर व्हावा, ही ज्ञानभाषा व्हावी, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून विविध सामाजिक संस्था राज्यात कार्यरत आहेत. तसेच मराठीच्या वापरासाठी साहित्य क्षेत्रातील लोकही कमी पडत नाहीत; परंतु कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी या दिवशीच मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा संवर्धनाला उजाळा दिल्या जात असल्याची वस्तुस्थिती आहे. शासनाकडून मराठी संवर्धनासाठी अपेक्षित अशी विशेष तरतूद होताना दिसून येत नाही; मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा मराठी विभाग मराठी भाषा संवर्धनाबाबत सध्या जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठाच्या मराठी विभागाकडून वर्षभरात राबविण्यात येणार्या उपक्रमाला ‘मराठी भाषा संवर्धन उपक्रम’ हे अर्थपूर्ण शीर्षकच दिलेले आहे.
दरम्यान, २२ जानेवारी साहित्य अकादमी आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लोकसाहित्याचा आधुनिक मराठी साहित्यावर प्रभाव’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र अमरावतीला घेण्यात येत आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा गोडवा निर्माण व्हावा, या उद्देशाने विविध कविसंमेलन, वादविवाद स्पर्धा, कार्यशाळा घेण्यात येत आहेत. अमरावती विद्यापीठांतर्गत येणार्या बुलडाणा, वाशिम, अकोला, अमरावती व यवतमाळ येथील मराठी विभागप्रमुखांकडून कार्यक्रम होताहेत.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यास आजपासून प्रारंभ
मराठी भाषेचा सर्वांगीण विकास व भाषेच्या संवर्धनाच्या दृष्टीने शासनस्तरावरून १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. यामध्ये केवळ मराठी विभागाचाच सहभाग महत्त्वाचा नाही तर शाळा, महाविद्यालय व सर्वच शासकीय कार्यलय, सामाजिक संस्था अशा सार्वत्रिक स्तरावर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे.
मराठी विभागाचा लोककला महोत्सवावर भर
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत मराठी विभागाकडून लोककला महोत्सवावरही भर दिल्या जात आहे. गतवर्षी आदिवासी लोकनृत्याचा लोककला महोत्सव मराठी विभागाकडून आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विदर्भातील सर्वच लोककलावंत बोलावण्यात आले होते. तसेच आता साहित्य आकादमीचा राष्ट्रीय स्तरावरील लोककला महोत्सवही अमरावती विद्यापीठात होऊ शकतो, अशी माहिती अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुखांनी दिली आहे.
मराठी भाषा संवर्धनासाठी अमरावती विद्यापीठ मराठी विभागाकडून वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा सार्वत्रिक असल्याने सर्व विभागाने यासाठी गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. अद्यापही शासकीय कार्यालयात मराठी भाषा संवर्धनाविषयी जागृतीची गरज आहे.
- डॉ. मनोज तायडे,
मराठी विभाग प्रमुख, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती.