टंचाईग्रस्त गावांना तात्पुरत्या नळ योजनेचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 06:16 PM2020-04-07T18:16:35+5:302020-04-07T18:16:53+5:30
टंचाईग्रस्त या गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तात्पुरत्या नळ योजनेचा आधार होणार आहे.
बुलडाणा: जिल्हा परिषदच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखड्यामध्ये समाविष्ट असलेल्या लोणार व देऊळगांव राजा तालुक्यातील काही गावांसाठी नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. बुलडाणा तालुक्यातील मोहोज व ढालसावंगी गावांसाठी तात्पूरती पूरक नळ योजना मंजूर करण्यात आली आहे. टंचाईग्रस्त या गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तात्पुरत्या नळ योजनेचा आधार होणार आहे.
जिल्हा परिषद बुलडाणा यांच्यावतीने पाणी टंचाई कृती अराखडा २०१९-२० मध्ये समाविष्ट असलेल्या गावांसाठी नळ योजनेची विशेष दुरूस्ती मंजूर करण्यात आली आहे. सध्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाईला सुरूवात झाली आहे. बुलडाणा तालुक्यातील मोहोज व ढालसावंगी गावांसाठी तात्पूरती पूरक नळ योजना मंजूर करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नळयोजनेची विशेष दुरूस्ती लोणार तालुक्यातील पिंपळनेर व देऊळगाव राजा तालुक्यातील पिंप्री आंधळे, मेंडगाव या गावांसाठी पाणी टंचाई निवारणार्थ करण्यात आली आहे. या उपाययोजनेची मोहोजची किंमत चार लक्ष ६७ हजार ३०० रुपये आहे. ढालसावंगी येथील १४ लक्ष २१ हजार ८२० रूपये, पिंपळनेरची ५ लक्ष ६४ हजार ९५० रुपये, पिंप्री आंधळेची ९ लक्ष २९ हजार ९८० रुपये आणि मेंडगांवच्या कामाची किंमत ३ लक्ष ४४ हजार १२० रूपये आहे. मंजूर नळ योजना विशेष दुरूस्ती ही किमान खर्चाची असल्याबाबत तसेच मंजूर कामे वेळीच पूर्ण होऊन प्रत्यक्ष चालु टंचाई कालावधीत या योजनेतून लाभार्थ्यांना पाणी उपलब्ध होऊ शकेल, याची खात्री कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, व संबंधित ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उप विभागीय अभियंता / अधिकारी यांनी केल्यानंतरच मंजूर कामास सुरूवात करता येणार आहे. या कामांमुळे टंचाईग्रस्त गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास मदत होणार आहे.