प्रवासात केली जाते जनजागृती
By admin | Published: July 20, 2014 11:46 PM2014-07-20T23:46:40+5:302014-07-20T23:46:40+5:30
शेगाव वाहकाचा स्तुत्य उपक्रम
उंद्री: 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' महाराष्ट्र शासनाच्या या ब्रिदवाक्याला साद घालत व प्रवासी हेच आमचे दैवत मानत प्रवाशांच्या अडीअडचणी जाणून त्यावर योग्य तो उपाय प्रवाशांचे समाधान करत एस. टी. बसच्या सेवेबद्दल महाराष्ट्र शासनाच्या योजनांची व उपक्रमांची माहिती बसमधील प्रवाशांना देत, प्रबोधनाचा अनोखा पायंडा बसमधील वाहकाने पाडला आहे.
सकाळी ठिक ५.४५ मि. संतनगरी शेगाव येथील आगारातून एक एस.टी. बस कुर्ला-नेहरुनगर दादर मुंबई जाण्यासाठी निघते. तेव्हा एस.टी. प्रवाशांना चकीत करणारा पण सुखद आनंद मिळतो. गुडमॉर्निंग, शुभप्रभात असं मृदु स्वरात बोलून हॅप्पी जर्नी, मी कुर्ला नेहरुनगर आगार शंकर गणपत औटी व माझ्या सोबत अहमदनगर तारकपूर आगाराचे चालक सतीष राठोड आपले शेगाव-कुर्ला नेहरुनगर बसमध्ये मन:पूर्वक स्वागत आहे. आपण आता संतनगरी शेगाव येथून कुर्ला नेहरुनगर येथे प्रवास करीत आहोत. आपण दादर मुंबईला ठिक रात्री १0 वाजता पोहचू.
त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या प्रवाशांसाठी काय योजना व उपक्रम आहेत त्याविषयी प्रवाशांना माहिती देतात. विदर्भ पंढरी असलेल्या संतनगरी शेगाव विषयी व संस्थान विषयी माहिती देऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आरामदायी व सुरक्षित प्रवास करायचा अशी विनंती करतात. माझा सर्व बंधुभगिनी, जेष्ठ व सर्वश्रेष्ठांना माझा नमस्कार. एस.टी. बस प्रवास करीत असतांना आपल्या स्वत:ची व सोबत असलेल्या अबालवृध्द यांची कशी काळजी घ्यावी, एस.टी. बस आपली समजून सर्वांनी स्वच्छता राखावी, इतकेच नव्हे तर मधुमेही रुग्णांसह इतरांना काही त्रास असल्यास व गरज भासल्यास मला निसंकोचपणे सांगा व जेष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी बस केव्हाही थांबविण्यात येईल असे आश्वासनही ते प्रवाशांना देतात व संतनगरी शेगावची महती कथन करतात.
एस.टी. महामंडळाच्या सेवेबद्दल सतत टिका होत असतांना अशी उत्तम, आपुलकीची व आपल्या दैवता प्रती असलेली एस.टी. वाहकाची निष्ठा दिसून येते. शंकर गणपत औटी व त्यांना सर्मथ साथ देणारे सतीष राठोड हे उत्कृष्ट सेवा, सामंजस्य व जिव्हाळा दाखवून प्रवाशांना अचंबित करतात. प्रत्येक दोन तासानंतर शंकरराव हे परिवहन महामंडळाच्या उपक्रमांची व योजनांची माहिती देत, जनजागृती करतात.