सिंदखेडराजात उद्यापासून जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:56 AM2021-05-05T04:56:31+5:302021-05-05T04:56:31+5:30
सिंदखेडराजा : शहरात गत काही दिवसांपासून काेराेनाचे रुग्ण वाढतच आहेत़ त्यात नागरिक जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत ...
सिंदखेडराजा : शहरात गत काही दिवसांपासून काेराेनाचे रुग्ण वाढतच आहेत़ त्यात नागरिक जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने ५ मेपासून ११ मेपर्यंत जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे़ यासंदर्भात सोमवारी पालिकेत बैठक झाली असून यात जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे.
नगराध्यक्ष सतीश तायडे व मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी संयुक्तरीत्या एक प्रसिद्धीपत्रक जारी केले असून यात जनता कर्फ्यूच्या संपूर्ण कालावधीत काय बंद आणि काय सुरू राहील याची माहिती देण्यात आली आहे.
केवळ आवश्यक सेवा सुरू राहणार आहेत़ जनता कर्फ्यूच्या ७ दिवसांच्या कालावधीत शहरातील दवाखाने, औषधी दुकाने, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी पूर्णवेळ सुरू राहणार आहेत, तर दूध डेअरी सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे़ त्यानंतर डेअरी सुरू असणार नाही. बँक, एटीएम व विमा कार्यालय सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असणार आहे. याव्यतिरिक्त शहरातील कोणतेच व्यवहार सुरू राहणार नाहीत.
बाहेर पडल्यास कायदेशीर कारवाई होणार
या जनता कर्फ्यूच्या काळात होम आयसोलेशन असलेल्या व्यक्तींनी घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. इतर नागरिकांना आवश्यक कामासाठीच बाहेर पडता येणार आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कोविड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सात दिवसांत रुग्ण तपासणी गरजेची
जनता कर्फ्यूच्या काळात संपूर्ण व्यवहार बंद असणार आहेत. या काळात शहरातील रुग्ण तपासणी सर्व्हे झाल्यास पॉझिटिव्ह रुग्णांचा निश्चित आकडा समजू शकेल़ अत्यावश्यक रुग्णांना गरजेनुसार रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला जाऊ शकेल आणि किरकोळ लक्षणे असलेल्यांना घरीच विलगीकरणात ठेवता येणार आहे़