विवेकानंद आश्रमाच्या फिरते रुग्णालयास जनतेचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:21 AM2021-07-05T04:21:38+5:302021-07-05T04:21:38+5:30
हिवरा आश्रम : विवेकानंद आश्रमाच्या हॉस्पिटलद्वारे गुरुवारपासून डॉक्टर आपल्या गावात म्हणजेच आश्रमाचे फिरते रुग्णालय या उपक्रमाला सुरुवात झाली. कोरोना ...
हिवरा आश्रम : विवेकानंद आश्रमाच्या हॉस्पिटलद्वारे गुरुवारपासून डॉक्टर आपल्या गावात म्हणजेच आश्रमाचे फिरते रुग्णालय या उपक्रमाला सुरुवात झाली. कोरोना पश्चात रुग्णांची स्थिती जाणून उपचार करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, नेत्रतपासणी व इतर सर्व आजारासंबंधी संस्थेचे फिरते रुग्णालय तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकासह लोकांची मोफत आरोग्य तपासणी करीत आहे.
गुरुवारी गजरखेड या गावात झालेल्या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १०० रुग्णांनी आपली विनामूल्य तपासणी करून घेतली. यावेळी सरपंच रामेश्वर सुरूशे, ग्रामसेवक संजय रिंढे यांनी रुग्णांना फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याचे आवाहन केले. शुक्रवारी लोणी या गावात सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या शिबिरात १७५ रुग्णांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेचा लाभ घेतला. सरपंच अशपाक पठाण, उपसरपंच गोविंद देशमुख, मुख्याध्यापक नाटेकर, ग्रामसेवक दत्तात्रय काळे यांनी शिबिर आयोजनासाठी सहकार्य केले. ३ जुलै रोजी नांद्रा धांडे या गावात १३५ रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. या फिरत्या रुग्णालयाचा जनतेला लाभ होत असून, विनामूल्य तपासणीमुळे शहरात जाण्याचा प्रवास खर्च, डॉक्टरांची फी व वेळ यात बचत होत असल्यामुळे रुग्ण समाधान व्यक्त करीत आहेत. गरजेनुसार रुग्णांचा ईसीजी, रक्त तपासणी या सुविधा सुद्धा संस्थेमार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पथकाचे प्रमुख डॉ. आशिष चांगाडे एम.डी. मेडिसीन व त्यांची टीम शिबिराच्या यशस्वीतेसाठी व जास्तीत जास्त रुग्णांना या मोफत सेवेचा लाभ होण्यासाठी प्रयत्नशील आहे. आज, रविवारी कल्याणा या गावात हे पथक जाणार असून, गावकऱ्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा. शिबिराचे एक महिन्याचे नियोजन दररोज एक गाव याप्रमाणे विवेकानंद हॉस्पिटलद्वारा एक महिन्याच्या शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. अतिवृष्टी, रस्त्यांची अडचण व कोरोनाची संभाव्य भीती ही अडचण आल्यास गावातील समन्वयकास तसे कळविण्यात येईल. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आश्रमाच्या वतीने करण्यात आले.
काेट
प्रत्येकाला निरोगी जीवन लाभावे व प्रत्येक जीव सुखी व समाधानाने जगावा हा शुकदास महाराजांच्या शिकवणुकीचा व विचारांचा वारसा जपण्यासाठी संस्थेद्वारा सुरू असलेले फिरते रुग्णालय हा अल्पसा प्रयत्न आहे. संतोष गोरे, सचिव विवेकानंद आश्रम