वाहतुकीची कोंडी व अपघातामुळे जनता त्रस्त
By Admin | Published: July 17, 2014 12:02 AM2014-07-17T00:02:23+5:302014-07-17T00:42:30+5:30
सिंदखेडराजा : रस्ता सुरक्षा नियमाचे सर्रास उल्लंघन
सिंदखेडराजा : कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवून शहरातील वाहनधारकांनीच रस्ता सुरक्षा धोक्यात आणली आहे. नियमाचे पालन होत नसल्यामुळे येथील बसस्थानकासमोर वाहतुकीची दररोज कोंडी होते, त्यामुळे जनता त्रस्त झाली आहे.
सिंदखेडराजा महामार्गाच्या दोन्ही बाजूचे वाढत असलेले अतिक्रमण, दररोज उभ्या राहणार्या काळ्या-पिवळ्या, ऑटो, ट्रॅक्टर, जिपगाड्या, मोटारसायकली व महामार्गावरुन सुसाट वेगाने धावणार्या वाहनामुळे आजपर्यंत अनेक जण दगावले आहेत. तर काहींना कायमचे अपंगत्व आले. या महामार्गावरुन प्रत्येक दिवशी १५0 ते २00 एस.टी.महामंडळाच्या गाड्या, कंटेनर, व्हाल्वोच्या मालवाहतूक गाड्या भरधाव वेगाने धावतात. विश्रामगृहा पासून पंचायत समिती, तहसील, बुलडाणा अर्बन, जिजामाता विद्यालय, भारतीय स्टेट बँक, संत भगवान बाबा कॉलेज, तालुका कृषी कार्यालय, राष्ट्रमाता जिजाऊ विद्यालय, मराठी प्राथमिक न.प.शाळा, चिखली अर्बन बँक, बसस्थानक, सिद्धेश्वर प्राथमिक शाळा, रुग्णालय, कृषी तंत्र विद्यालय सह दैनंदिन कामकाजाच्या निमित्ताने याच महामार्गावरुन रहदारी करावी लागते.
तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला होटेल्स व उद्योग व्यावसायीक असल्याने ग्राहकांची गर्दी वेगळीच. एक महिन्यापूर्वी झोरे पादचार्याचा अपघाती मृत्यू झाला. तर भास्कर हिवाळेसह तिघांना एकाच अपघातामध्ये जीव गमवावा लागला. तर वडगाव तेजन येथील दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू झाला. तर दोन शाळकरी मुले ट्रकच्या खाली मृत्युमुखी पडले. महामार्गाच्या वळण रस्त्यावर माळसावरगाव जवळ दर पंधरा दिवसाला अपघात होऊन अनेकांचे बळी गेले आहेत, त्यामुळे या परिसरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांनी आता कायद्याचा बडगा हाती घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. स्थानिक पालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग व नागरिकांनीही सकारात्मक भूमिका घेऊन वाहतुकीचे नियम पाळले तर रस्ता सुरूक्षा कायम राहू वाहतुकीची कोंडी होणार नाही, त्यामुळे यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.