बुलडाणा जिल्ह्यात देणार दोन लाख ८४ हजार बालकांना डोज; पोलिओ लसिकरण मोहिमेसाठी यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2018 02:41 PM2018-01-27T14:41:36+5:302018-01-27T14:44:20+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात दोन सत्रामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात २८ जानेवारी तर दुसर्या टप्प्यात ११ मार्च रोजी ही मोहीम राबविली जाईल.
बुलडाणा : जिल्ह्यात दोन सत्रामध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत असून पहिल्या टप्प्यात २८ जानेवारी तर दुसऱ्या टप्प्यात ११ मार्च रोजी ही मोहीम राबविली जाईल. दरम्यान, पहिल्या टप्प्याच्या अनुषंगाने आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असून शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओ डोस रविवारी पाजण्यात येईल. या मोहिमेतंर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गोफणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या मोहिमेसाठी जिल्ह्यात २०४७ पोलिओ बुथची व्यवस्था करण्यात आली असून १३० मोबाईल टीम, सहा रात्रीच्या टीम सज्ज करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. मोहिमेसाठी पाच हजार ५०६ कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत. जिल्ह्यातील सर्व गावे, वाड्या, वस्ती, तांडे, विटभट्टी, मेंढपाळ, आदिवासी कुठल्याही स्तरावरील बालक या डोजपासून वंचित राहणार नाही, याची काळजी आरोग्य यंत्रणेने घ्यावी, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील ग्रामीण भागात दोन लाख २७ हजार ६८ बालके असून शहरी भागात ५७ हजार ४७२ बालके आहेत. एकूण दोन लाख ८४ हजार ५४० बालकांना पोलिओ लसीकरण करण्याचे उदिष्ठ आहे. या कार्यात आरोग्य विभागासोबत विविध विभागातील एकूण पाच हजार ५०६ कर्मचारी सहकार्य करणार आहेत. त्यासाठी ४२७ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून तीन लाख ५७ हजार व्हॅक्सीन डोजेसची व्यवस्थाही करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाने बैठकीत दिली.