एप्रिल महिन्याच्या डाळीचा अद्यापही पत्ता नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 06:47 PM2020-05-22T18:47:08+5:302020-05-22T18:48:04+5:30
जिल्ह्यातील तब्बल ७ तालुक्यांमध्ये अद्याप कोणतीही डाळ पोहोचलेली नाही.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत लाभार्थ्यांना वितरीत करण्यासाठी जिल्ह्यातील तब्बल ७ तालुक्यांमध्ये अद्याप कोणतीही डाळ पोहोचलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात मोफत डाळ वितरणाचा तिढा सुटता-सुटत नसल्याचे चित्र असतानाच शेगाव, मलकापूर आणि खामगाव तालुक्यात निकृष्ट दर्जाच्या तूर डाळीचा पुरवठा करण्यात आल्याचे चित्र आहे. परिणामी, शेगाव येथील तूर डाळीचा पंचनामा केल्यानंतर ही डाळ परत पाठविण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत माहे एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबत प्रतिमहिना प्रती कार्ड १ किलो चना अथवा तूर दाळ मोफत वितरीत केल्या जाणार असल्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. एप्रिल महिन्यात वितरीत करण्यात येणारी डाळ मे महिन्याअखेरीस जिल्ह्यातील तब्बल ७ तालुक्यात डाळ पोहोचलेली नाही. त्याचवेळी मलकापूर, खामगाव आणि शेगाव येथे अतिशय निकृष्ट दर्जाच्या तूर डाळीचा पुरवठा करण्यात आल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.
शेगाव येथून डाळ पाठविली होती परत!
शेगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना वितरीत करण्यासाठी पाठविण्यात आलेली तूरडाळ ही निकृष्ट दर्जाची पाठविण्यात आली. त्यामुळे स्थानिक महसूल प्रशासन आणि पुरवठा विभागाकडून ही डाळ परत पाठविण्यात आली. मात्र, वरिष्ठ स्तरावरील दबावानंतर बुधवारी सायंकाळी पुन्हा तीच डाळ शेगाव येथे उतरविण्यात आली. शेगाव सारखीच परिस्थिती मलकापूर, मोताळा आणि खामगाव येथे असल्याचे दिसून येते.
तूर डाळ प्राप्त झाल्यानंतर निकृष्ट असल्याने परत पाठविण्यात आली होती. मात्र, नाफेडच्या अधिकाºयांनी ही डाळ खाण्यायोग्य असल्याचा निर्वाळा दिला. परिणामी, शेगाव तालुक्यातील वितरणासाठी ही डाळ पुन्हा उतरविण्यात आली आहे.
- शिल्पा बोबडे
तहसीलदार, शेगाव.
जिल्ह्यातील काही ठिकाणी डाळ पोहोचली आहे. मात्र, अद्यापही जवळपास ७ तालुक्यांना डाळीची प्रतीक्षा आहे. पोच झालेल्या तालुक्यांमध्ये तूर डाळ निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यासंदर्भात १८ मे रोजी पुरवठा विभागाकडे तक्रारही दिली आहे.
- राजेश अंबुसकर
जिल्हाध्यक्ष,
बुलडाणा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार, संघटना.