पंक्चर काढणाऱ्यांना मिळाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:31 AM2021-03-07T04:31:43+5:302021-03-07T04:31:43+5:30
ग्रामीण भागात स्वॅब घेण्याचे प्रमाण वाढवा बुलडाणा : ग्रामीण भागातही स्वॅब घेण्याचे प्रमाण वाढवावे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील कुणीही सुटता ...
ग्रामीण भागात स्वॅब घेण्याचे प्रमाण वाढवा
बुलडाणा : ग्रामीण भागातही स्वॅब घेण्याचे प्रमाण वाढवावे. बाधित व्यक्तीच्या संपर्कातील कुणीही सुटता कामा नये. बाधित रुग्णांना कोविड केअर सेंटरलाच भरती करून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी आढावा बैठकीत केले.
हाेम क्वारंटाईनच्या घरावर लागणार स्टिकर
बुलडाणा : होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारावा. ज्या रुग्णांकडे विलगीकरणाची स्वतंत्र व्यवस्था आहे, अशा रुग्णांना होम आयसोलेशन दिले असल्यास, त्यांच्या घरावर विलगीकरण केल्याच्या तारखेसह स्टिकर चिकटवावे, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
हरभरा खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
बिबी : जिल्ह्यात हरभरा खरेदी केंद्र लवकरच सुरू हाेणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. फेडच्या वतीने हरभरा खरेदी हमीदर ५ हजार १०० रुपये प्रती क्विंटलप्रमाणे खरेदी करणे सुरू झाले आहे. सध्या हरभऱ्याची आवक वाढली आहे.
जातवैधता प्रमाणपत्रांची हाेणार फेरतपासणी
जानेफळ : सन २०११-१२ या कालावधीतील निर्गमित केलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या जातवैधता प्रमाणपत्रांची फेर तपासणी करण्यात येणार आहे. उमेदवारांची यादी नाेटीस बाेर्डवर लावण्यात आली आहे. यादीत नाव असणाऱ्या उमेदवाराने त्यांचे जातवैधता प्रमाणपत्र, जातीचा दाखला व जातीविषयक सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दूध वितरण केंद्रांना मिळाली सूट
बुलडाणा : जिल्ह्यात रविवारी लाॅकडाऊन करण्यात आले असून, दूध विक्रेते, दूध वितरण केंद्र सकाळी ६ ते दुपारी ३ व सायं ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत नियमितपणे सुरू राहणार आहेत. या औषधी सेवा, दवाखाने, रुग्णवाहिका सेवा, एसटी वाहतूकही सुरू राहणार आहे.